कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने प्रकाश आंबेडकर यांना समन्स बजावले !

प्रकाश आंबेडकर

पुणे – कोरेगाव भीमा येथे वर्ष २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे.एन्. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा द्विसदस्य आयोग स्थापन केला आहे. आयोगाकडून मुंबई आणि पुणे येथे उलट तपासणी घेण्यात येत असून राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदींची साक्ष, तसेच उलट तपासणी घेतली जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक असलेल्या हर्षाली पोतदार आणि पुणे येथील विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना उपस्थित रहाण्याचे समन्स बजावले आहेत. आंबेडकर यांची उलट तपासणी ८ आणि ९ फेब्रुवारी, पोतदार यांची उलट तपासणी ९ आणि १० फेब्रुवारी, तर कदम यांची १२ फेब्रुवारी या दिवशी होईल. पुराव्यांच्या नोंदीसाठी आयोगाची ही शेवटची सुनावणी असण्याची शक्यता असल्याने स्थगिती नसेल, असे आयोगाने म्हटले.