तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) येथे कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींचे अवशेष हौदामध्ये अस्ताव्यस्त !

श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

पुणे – तळेगाव दाभाडे नगर परिषद आरोग्य विभागाने गतवर्षीच्या गणेशोत्सवात श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी बांधलेले विसर्जन हौद देखभालीअभावी डासोत्पत्तीची केंद्रे बनली आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे गतवर्षीच्या गणेशोत्सवातही पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन योग्य असल्याचे सांगत नगर परिषद प्रशासनाने श्री गणेशमूर्ती विहीर, नदी अथवा तलाव येथे विसर्जित न करता मूर्तीदान अथवा कृत्रिम हौदात विसर्जित करण्याचे आवाहन श्री गणेशभक्तांना केले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसादही दिला; मात्र मूर्ती विसर्जनासाठी सिद्ध केलेल्या संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा आणि थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळेच्या आवारातील कृत्रिम हौदांची कोणतीही देखभाल आरोग्य विभागाने केलेली नाही. श्री गणेशमूर्तींचे अवशेष हौदात अजूनही अस्ताव्यस्त पडलेले आहेत. (भक्तीभावाने पूजा केलेल्या आणि ज्याच्याशी हिंदूंच्या भावना निगडित आहेत, अशा श्री गणेशमूर्तीची विटंबना करणार्‍या प्रशासनाला भाविकांनी जाब विचारणे आवश्यक ! – संपादक)

१. विसर्जन हौदातील पाणी उपसून ते कोरडे करणे आवश्यक असतांना सद्यःस्थितीत हौदात साचलेल्या पाण्यात पालापाचोळा, गटारसदृश्य डबकी सिद्ध झाली आहेत. श्री गणेशमूर्ती विसर्जन हौद डबकेरूपी डासोत्पत्तीचे केंद्र बनले आहे.

२. तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाच्या संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेच्या आवारातील (गुलाबी शाळा) विसर्जन हौदात साचलेल्या गलिच्छ पाण्यातील डासांचा विद्यार्थी, शिक्षक यांसह आजूबाजूच्या रहिवाशांनाही त्रास होत आहे.

३. नगर परिषद आरोग्य विभागाला वारंवार सांगूनही उपाययोजना होत नाही. त्यामुळे डासांमुळे होणार्‍या डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

४. नगर परिषद आरोग्य विभागाने श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी वापरलेल्या कृत्रिम हौदातील पाणी काढून स्वच्छता करावी आणि वर्षभर देखभालीत सातत्य ठेवावे, अशी मागणी पालक आणि आजूबाजूच्या रहिवासी नागरिकांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या हे लक्षात का येत नाही ? – संपादक)

विसर्जन हौदामध्ये श्री गणेशमूर्ती विरघळण्यासाठी सोडियम पावडरचा वापर !

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक मयूर मिसाळ यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा आणि थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळेच्या आवारात नगर परिषदेने बनवलेल्या कृत्रिम विसर्जन हौदामध्ये मूर्ती विरघळण्यासाठी सोडियम पावडर टाकण्यात आली होती. (नगर परिषदेने याची कल्पना भाविकांना दिली होती का ? पूजन केलेली श्री गणेशमूर्ती सोडिअम बाय कार्बोनेट म्हणजे रासायनिक प्रक्रियेने विसर्जनाचा प्रयत्न करणे ही गणेशाची विटंबनाच आहे ! – संपादक) त्यामध्ये शाडूच्या श्री गणेशमूर्ती विरघळल्या; मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींचे अवशेष अद्याप शिल्लक आहेत. दोन्ही हौद लवकरच स्वच्छ करून कोरडे केले जातील.

(साभार : दै. सकाळ)

संपादकीय भूमिका :

कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्ती विसर्जित करण्याचे हे आहेत गंभीर परिणाम ! कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या श्री गणेशमूर्तींची मोठ्या प्रमाणावर विटंबना होते, यात कोणत्याही प्रकारे श्री गणेशमूर्तीचे पावित्र्य राखले जात नाही, हे विविध घटनांमधून वारंवार सिद्ध होते. असे असल्यामुळे भाविकांनी प्रशासनावर विश्वास न ठेवता धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे !