महाशिवरात्री दिवशी झालेल्या विशेष भक्तीसत्संगात अंबाजोगाई येथील सौ. सुनीता पंचाक्षरी (वय ४७ वर्षे) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. सत्संगात सांगितल्याप्रमाणे कैलास पर्वत आणि मानसरोवर अनुभवता येणे

‘२५० व्या भक्तीसत्संगाच्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात गारवा जाणवत होता. अधून-मधून वार्‍याचा शीतल स्पर्श अंगाला होत होता. भक्तीसत्संग चालू झाल्यावर ‘रामनाथी आश्रम म्हणजेच कैलास पर्वत आहे’, असे मला जाणवले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सत्संगात कैलास पर्वताचा जसा अनुभव सांगत होत्या, तसाच अनुभव मला घेता येत होता. तसेच निर्मळ जल असलेल्या मानसरोवराचे दर्शन घेतांना त्याच्या तळाचेही मला दर्शन झाले. त्यांनी ‘मानस सरोवरात पवित्र स्नान करूया’, असे सांगितले. तेव्हा सर्व साधक, सद्गुरु आणि संत पवित्र स्नान करत आहेत. सर्वांच्या अंगावर शुभ्र वस्त्र अन् गळ्यात रुद्राक्ष माळा आहेत आणि ‘स्वतःचे अस्तित्व जाऊन त्यांनी योगिनी रूप धारण केले आहे’, असे मला जाणवले.

२. कैलास पर्वताचे दर्शन घेतांना ‘सर्व जण शिवस्वरूप झाले आहेत’, असे जाणवणे

सौ. सुनीता पंचाक्षरी

पुढे कैलास पर्वतावर दर्शन घेण्यासाठी जात होतो. तेव्हा ‘माता पार्वती सर्वांना घेऊन जात आहे’, असे मला जाणवले आणि स्वतःच्या अन् सर्वांच्या ठिकाणी पुढे केवळ दिव्य ज्योती दिसत होत्या. ‘सर्व जण शिवस्वरूप झाले आहेत’, असे मला जाणवत होते. ‘शिवाच्या डमरूचा नाद होतांना अखिल ब्रह्मांड ढवळून निघत आहे’, असे दृश्य मला दिसले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे शिवरूपात, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे पार्वतीमातेच्या रूपात आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे गंगामातेच्या रूपात दर्शन होणे

गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) पुष्कळ विराट शिवरूपात, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ पार्वतीमातेच्या रूपात आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे शिवाच्या जटेत धारण केलेल्या गंगामातेच्या रूपात दर्शन झाले. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ शिवनंदी रूपात दिसत होते. श्री. विनायक शानभाग गणपति रूपात दिसले. भक्तीसत्संगात पूर्णवेळ माझे हात आपोआप जोडले जाऊन मला पुष्कळ भावाश्रू येत होते.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ ‘कर्पूर गौरं करुणावतारं’चा भावार्थ सांगतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ ‘कर्पूर गौरं करुणावतारं’चा भावार्थ सांगत असतांना मला श्री गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन झाले आणि शेवटी माझ्या हाताची मुद्रा होऊन मी पंचारती केली. पूर्ण वेळ मला स्वतःचे अस्तित्व जाणवले नाही.

ही अनुभूती दिल्याबद्दल शिवस्वरूप गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– सौ. सुनीता पंचाक्षरी, अंबाजोगाई, जिल्हा बीड. (२७.२.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक