सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये ‘श्रीराम नामसंकीर्तना’चे आयोजन
अयोध्या – अयोध्येतील श्रीराममंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले. उत्तरप्रदेश राज्यातील अयोध्या, वाराणसी, भदोही, सैदपूर, जौनपूर आणि बिहारमधील पाटलीपुत्र, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, गया, सोनपूर, बेगुसराय अशा विविध जिल्ह्यांतील मंदिरांमध्ये ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्यानिमित्त ८ दिवस श्रीरामांचे गुण आणि वैशिष्ट्ये यांच्याविषयी ‘ऑनलाईन’ प्रबोधन करण्यात आले, तसेच उपस्थितांकडून ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप करवून घेण्यात आला. याचसमवेत ‘प्रत्येकाने धर्माचे पालन करून रामराज्यातील प्रजेप्रमाणे सद्गुणी बनावे’, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात आले.
यासमवेतच उत्तरप्रदेशातील भदोही, सैदपूर, नटवा आणि बिहारमधील पाटलीपुत्र, छपरा, दरभंगा, सोनपूर येथील काही मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. ‘श्रीरामाविषयी तात्त्विक आणि शास्त्रीय माहिती भक्तांना मिळावी’, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने अनेक ठिकाणी ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले होते. या वेळी श्रीरामाच्या नामपट्ट्या आणि सात्त्विक चित्र यांचे भाविकांना वितरण करण्यात आले.