वेदांतातील ‘पुत्रध्वनी दृष्टांता’चे अध्ययन करून मनाच्या स्तरावर तो अनुभवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मन निर्विचार होऊन त्याचा प्रभाव नंतरही टिकून रहाणे
पार्श्वभूमी : अद्वैतदर्शनाचे (वेदांताचे) अध्ययन म्हणजे ‘ब्रह्म काय आहे ?’, हे बुद्धीने समजून घेणे. या माध्यमातून ‘ईशप्राप्ती कशी होते ?’, या प्रश्नाचे उत्तर आहे की, एखादे सूत्र बुद्धीला जेवढे स्पष्ट होते (म्हणजे त्याचे ज्ञान होते) तद्नुरूप जीवनदृष्टी आपोआप पालटते. ते व्यक्तीमध्ये रुजल्याने व्यक्तीवर नंतर सतत परिणाम करत रहाते, जणू बिजापासून आतमध्ये मुळे विस्तारतात आणि दुसरीकडे दृश्यमान रोपही वाढते. अर्थात् हे होण्यासाठी त्या विषयाच्या संदर्भातील थोडे अध्ययन आणि मनन अल्पकाळ का होईना, नित्य होत रहायला हवे. मी सामान्यतः सकाळी १५ मिनिटे आणि रात्री १५ ते २० मिनिटे इतका वेळ यासाठी देतो. अध्ययन म्हणजे ‘परोक्ष ज्ञान’, तर त्याची परिपूर्ण अनुभूती मिळणे, हे ‘अपरोक्ष ज्ञान’. ‘परोक्ष ज्ञाना’चे महत्त्वही शास्त्र सांगते. शास्त्रकार मुनी सकृतदर्शनी तात्त्विक आणि क्लिष्ट वाटणारा हा विषय चांगला स्पष्ट व्हावा, यासाठी कित्येक उपमा आणि दृष्टांत यांचा वापर करतात. वेदांतामधील या उपमा, दृष्टांत आणि कथा अत्यंत मनोज्ञ (सुंदर), तसेच साधकांसाठी उपयुक्त आहेत. त्यांची गोडी अवीट आहे. सहस्रो वर्षे या जिज्ञासूंना साहाय्य करत आल्या आहेत, यात सर्वकाही आले. अद्वैतदर्शनाच्या अध्ययनाची इच्छा निर्माण होणे, जे वाचले जाईल, ते कंटाळवाणे न वाटता त्याची गोडी निर्माण होणे, त्यामुळे ते वाचन, मनन चालू ठेवले जाणे, त्यातून काही तरी आकलन होऊन उत्साहवर्धन होणे, त्यामुळे मन पालटणे ही प्रक्रिया चालू होणे इत्यादी सर्वकाही श्री गुरूंच्या कृपेनेच होते. ‘सदिच्छा’ शब्दाचा अर्थच आहे, ‘सत्’ची इच्छा. हे अध्ययन करत असतांना वरील सूत्रे मनाला उलगडली. या प्रक्रियेत ‘कोणत्या सूत्रामुळे काय पालट झाला ?’, हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. एक दृष्टांत वाचल्यानंतर तो अनुभवण्याचा प्रयत्न केल्यानंतर काय झाले, ते संक्षेपात मांडायचा प्रयत्न केला आहे. २६.६.२०२२ या दिवशी हा दृष्टांत वाचनात आला.
१. पुत्रध्वनी दृष्टांत
वेदांचे सामूहिक पठण चालू असतांना तेथील अनेक प्रकारच्या आवाजांत मिसळून गेलेला पठणात सहभागी असलेल्या आपल्या पुत्राचा परिचित आवाज पित्याला अल्पशा प्रयत्नांनी ओळखता येतो. त्याचप्रमाणे मनाच्या एकाग्र अवस्थेत जगतात अंगभूत आणि चिरंतन असलेले आत्मतत्त्व कोट्यवधी गोष्टींतून स्वतःला ओळखता येते.
२. मनातील प्रक्रिया
एकाग्रतेच्या आधारे स्वतःमध्ये वरील प्रकारे काही अंतर्यामी ऐकण्याचा प्रयत्न केला असता आरंभी ‘आतमधून काही आवाज ऐकू येतो का ?’, हे मन शांतपणे आणि एकाग्रतेने पहात राहिले. काही ध्वनी नव्हता. मग वाटले, ‘अशा स्थितीत ध्वनीचा शोध घ्यायचा नसून ‘मी आहे’, असे काहीसे वाटणारी जाणीव, म्हणजेच ‘ते (आत्म्याचे लक्षण)’ असावे. मग मनात उद्भवलेला शब्दमय विचार म्हणजे ‘ते’ नव्हे, मनात किंवा देहांत उत्पन्न होणारी विशिष्ट रसरूपी भावना म्हणजे ‘ते’ नव्हे, असे चालू होऊन जे जे मनात येत असेल अथवा जाणवत असेल, ते बाजूला जात राहिले. मग मन आणखी शांत आणि एकाग्र झाले. ‘क्षणिक काही विचार आलेला लक्षात येतो अन् लगेच जातो’, असे अल्पकाळ झाले. काही सेवा करून झाल्यानंतर सूचना सत्र करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मनाची एकाग्रता झाली असता मनात काहीच नव्हते. तेव्हा ‘ही शांतता, निर्विचारता’, म्हणजेच ‘पुत्रध्वनी’ आहे, असे वाटले. मग असे ‘काहीही नसणे’, म्हणजे वास्तवात वेगळे काही तरी ‘असणे’ आहे, हे जाणवले.
आणखी काही काळ गेल्यानंतर सेवा आदी करतांना मन वेगळ्या विचारांत गेले, तर मनातील अनावश्यक विचार चालू झाल्यानंतर त्यापासून अलग होऊन ते लक्षात येण्याचा अवधी अल्प होऊन मन आपोआप अनुसंधानात जात असल्याचे लक्षात आले. पूर्वी काही वेळा चांगले अनुसंधान साधले की, मनात भजन गुणगुणणे, गाणे गुणगुणणे असे व्हायचे. याचे कारण, म्हणजे अशा अनुसंधानाद्वारे अंतर्यामी प्राप्त आनंदाला वाट द्यायला हवी, असा मनात कुठे तरी दबाव असायचा. तो आनंद सांभाळायचा कसा, हे समजायचेच नाही. आता गाणे गुणगुणायचा प्रयत्न केला, तरी मनात गाणे उमटत नाही, असे झाले आहे. दिवस जात राहिले. आता वरील प्रक्रिया होऊन काही दिवस किमान दोनदा तरी हा दृष्टांत आठवत राहिला. जेव्हा आठवला, तेव्हा मनाची त्या वेळी जी स्थिती असेल, ती स्थिती पालटत राहिली. मन शांत अन नििर्वचार बनत असे.
२ अ. विचाराचे ‘अहम्’ आणि ‘इदम्’ या दोन घटकांचे महत्त्व मनात उलगडून अंतर्यामी संदर्भातील साधनाप्रक्रिया अधिक सहज होणे : वर सांगितल्यानुसार नित्य वाचन, वाचलेल्या सूत्रांचे मनन चालूच राहिले. नवीन सूत्रे मनावर परिणाम करत राहिली. याचे अनुभवलेले एक उदाहरण याप्रमाणे आहे. कोणत्याही विचाराचे दोन भाग असतात. एक ‘स्व’ (अहम्) विषयीचा असतो. दुसरा मायेतील घटकासंदर्भात (इदम्) असतो. पहिला जाणिवेच्या स्तरावरचा असून अतिशय सूक्ष्म असतो, दुसरा तुलनेने स्थूल असून तो भावनेच्या, शब्दांच्या स्तरावरील असतो, उदा. ‘मी पेरू पाहिला.’ यांत ‘मी’ हा ‘अहम्’विषयक, तर उर्वरित ‘इदम्’विषयीचा आहे. ‘इदम्’ हा मायेचा भाग असून तो अनंत आणि सतत पालटणारा आहे. साधकाने ‘इदम्’ भागाकडे दुर्लक्ष करून ‘अहम्’चा मूळ स्रोत शोधावा. पूर्वी कधी काळी माझ्या संदर्भात हा प्रयत्न अतिशय गांभीर्याने झाला होता. त्याचा त्या वेळी लाभही झाला होता. परत वाचनात तेच आल्यावर आता आतमध्ये ही प्रक्रिया अधिक सहज होऊ लागली.
२ आ. मनातील नकारात्मकता आणि बहिर्मुखता न्यून होणे : या सर्वांचा एकूण परिणाम, म्हणजे पूर्वीप्रमाणे नकारात्मक विचारांची वारंवारता अन् तीव्रता, तसेच बहिर्मुखतेची वारंवारता आणि तीव्रता आता न्यून झाली आहे. आता याचे स्मरण झाले की, मनातील विचार जाण्यासमवेत संपूर्ण देहभर, म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत अंतर्यामी ऊर्जेची किंवा संवेदनेची जाणीव होते. गेल्या दोन दिवसांत या दृष्टांताचे स्मरण होणेही बंद झाले आहे.
३. वरील लिखाण करण्यासंदर्भातील मनातील अडथळा दूर होणे
माझ्या मनात ‘हे सर्व लिहायला कशाला हवे’, असा विचार परत परत आला. ‘सगळे बुद्धीच्या स्तरावरचे म्हणून शुष्क आहे’, असेही वाटले. ‘त्याचा त्यामुळे इतरांना काही उपयोग नाही, मग लिखाण करण्यात काय अर्थ आहे. आपण अहंकारी आणि साधनेत बाळबोध असल्याने अशा सूत्रांच्या संदर्भात काही लिहायला अजिबात स्थान नाही’, असेही वाटले. मग गेल्या काही मासांत मनात एक विचार हळूहळू दृढ होत आहे, तो सुस्पष्ट झाला. तो म्हणजे ‘आपण कोणत्याही प्रकारे हे लिखाण करायला पात्र नसलो, तरी ‘वेदांतदर्शन’ ही एक जिवंत गोष्ट आहे.’ त्यामुळे अशा जिवंत गोष्टीच्या संदर्भात कुणीही सांगू शकतो. हे सांगणे म्हणजे, ज्यांनी हे आकलन करवून आणले, त्यांची म्हणजे श्री गुरूंची आणि ज्याच्याबद्दल आकलन झाले, त्याची स्तुती आहे. त्याचप्रमाणे हे वाचन केल्याने एरव्ही मी सनातन धर्मात जन्माला आलो, साधना करायची संधी मिळाली, थोडी वाचायची बुद्धी मिळाली. असे असतांना मी माझ्या धर्माच्या तत्त्वज्ञानाची तोंडओळखही करून घेतली नसती, तर मला जीवनात उणीव वाटली असती. आता या तत्त्वज्ञानाची तोंडओळख झाल्याने जे एक निराळे आंतरिक समाधान मिळाले आहे, त्याप्रती कृतज्ञता म्हणून तरी लिहायला हवे, असे वाटले. यातून मी शिकणार आहे. यातून पुढची दारे उघडणार आहेत. त्यामुळे मी ते करायला हवे.’
– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०२२)