नाटक हे दृकश्राव्य माध्यम असल्याने अधिक परिणाम करणारे असणे, त्यामुळे नाट्यकलेच्या माध्यमातून मुलांना धर्मशिक्षण दिल्यास त्यांच्या मनावर धर्माचे संस्कार होऊन त्यांच्या साधनेचा पाया सिद्ध होऊ शकणे
सौ. शुभांगी रामचंद्र शेळके यांचा परिचय
‘सौ. शुभांगी रामचंद्र शेळके वाणिज्य शाखेत पदवीधर असून त्या मागील २५ वर्षांपासून नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय’ आणि ‘नेहरू सेंटर’ यांचा एक वर्षाचा ‘नाट्यदिशा’ हा पदव्युत्तर पदविका (‘डिप्लोमा’) आणि मुंबई विद्यापिठाचा प्रयोगात्मक लोककला पदविका हे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. त्यांनी ‘नाट्यशास्त्र अन् चित्रपट (फिल्म्स)’ याविषयांत ‘स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापिठा’तून ‘एम्.ए.’ केले आहे. सध्या त्या मुंबई विद्यापिठातून ‘गोंधळ अन् पंडुवानी’ या लोककलांतील ‘नाट्यतत्त्वांचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयाचा विद्यावाचस्पतीसाठी (पीएच्.डी.साठी) अभ्यास करत आहेत. त्यांनी ‘गोंधळ, जागरण, भारूड, तमाशा, दशावतार’, अशा अनेक लोककलांवर आधारित लोकरंगभूमीवर काम केले आहे. त्यांनी ‘ओवी गाऊ ज्ञानेशाची’ या प्राचीन ऋषिमुनींच्या संशोधनपर कार्यावर लोककलांवर आधारित नाट्यरचना केली आणि एकाच वेळी १०० हून अधिक कलाकारांसहीत त्याची प्रस्तुतीही केली. त्यांनी अनेक मान्यवर कलाकारांच्या समवेत कामही केले आहे. नाट्यकलेविषयी त्यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
‘मला लहानपणापासूनच नाट्य, नृत्य, संगीत अशा विविध कलांची आवड होती. ईश्वरकृपेने माझे आजोबा (आईचे वडील कै. सुखदेव कांबळे) आणि माझे बाबा (श्री. महादेव आगावणे) यांच्याकडून आम्हा भावंडांना कलेचा वारसा मिळाला आहे. वयाच्या १० व्या वर्षापासून मी संतांच्या आणि पौराणिक भूमिका केल्या. त्यासाठी मी ईश्वरचरणी आणि माझे आजोबा अन् बाबा यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. देवाच्या या अपार कृपेला कृतज्ञतापूर्वक स्मरून मला संत किंवा देवता यांची नाटके करतांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. देवाच्याच कृपेने नाट्यकलेत आरंभीच ‘संत मुक्ताबाई’ ही भूमिका करायला मिळणे आणि त्याचा झालेला लाभ !
१ अ. शाळेत असतांना संगीत नाटक बसवणार्या बाईंनी साधिकेकडे पाहून ‘मुक्ताई सापडली’, असे म्हणणे : मी शाळेत पाचवीत शिकत असतांना आमच्या गायनाच्या राजाध्यक्षबाई ‘महाराष्ट्रातील संतमेळा’ हे संगीत नाटक बसवत होत्या. त्यांना अन्य सर्व संतांच्या भूमिकांसाठी विद्यार्थी सापडले होते; पण संत मुक्ताबाई आणि संत ज्ञानेश्वर यांच्या भूमिकांसाठी विद्यार्थी सापडत नव्हते. त्या माझ्या वर्गात आल्या. काही मुलींना विचारल्यावर माझ्याकडे पाहून त्या एकदम मोठ्याने म्हणाल्या, ‘‘हो ! सापडली मुक्ताबाई !’ ही माझी पहिलीच भूमिका !
१ आ. त्या लहान वयातही मुक्ताईच्या भूमिकेशी समरस होऊन ‘समाजासाठी पुष्कळ कार्य करायचे आहे’, या भावाने अभंग म्हटला जाऊन भावजागृती होणे : मुक्ताबाईची भूमिका करतांना मला वाटायचे, ‘मी १० वर्षांची मुक्ताबाई आहे आणि मला माझ्या मोठ्या बंधूंना, म्हणजे संत ज्ञानेश्वरांना ‘आपले कार्य पुष्कळ मोठे आहे. समाजाच्या हिणवण्याकडे दुर्लक्ष करून आपण ते अखंड करत राहिले पाहिजे’, असे तळमळीने सांगायचे आहे.’ त्यामुळे मी त्याच तळमळीने ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ हा अभंग म्हणत असे. हा अभंग म्हणतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत आणि सरावानंतर बाईंच्या डोळ्यांतूनही भावाश्रू येत असत. ‘संतांची भूमिका करणे’ हे ईश्वरी कार्य होते आणि ते कार्य तोच माझ्याकडून करून घेत होता. त्या नाटकातून संतांच्या कार्याचा आढावा घेतला होता आणि तो आम्हा मुलांसाठी पुष्कळ प्रेरणादायी ठरला.
१ इ. नाटकातील भूमिकेमुळे झालेले लाभ ! : संत मुक्ताबाईंची भूमिका माझ्यासाठी अविस्मरणीय ठरण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे संतांच्या चरित्राविषयी जाणून घेण्याची आवड निर्माण होऊन संतचरित्रांचे वाचन चालू झाले. दुसरे कारण, म्हणजे माझ्यात नाट्यकलेची आवड निर्माण झाली. माझे आजी-आजोबा (आईचे (श्रीमती विमल आगावणे यांचे) आई-वडील (श्रीमती शांताबाई आणि श्री. सुखदेव कांबळे ) वारकरी होते. आजोबा वारकरी कीर्तन आणि भारूड उत्स्फूर्तपणे अन् उत्कृष्ट सादर करत असत.
वरील प्रसंगातून माझ्या लक्षात आले, ‘संत किंवा वीरपुरुष यांच्या नाटिका शाळांमधून केल्या, तर निश्चितच बालमनांत ईश्वरभक्ती आणि शौर्य यांची बीजे रुजतील.’ गुरुकृपेने आम्हा भावंडांच्या मनात बालपणीच ही बीजे रुजली.
२. कुरुक्षेत्रावरील ‘श्रीकृष्ण-अर्जुन संवाद’ नाट्यरूपात करायला मिळणे आणि त्यामुळे मनावर गीतेच्या उपदेशाचा प्रभाव पडून साधनेचा पाया सिद्ध होणे
२ अ. साधिका आणि तिचा मोठा भाऊ श्री. दीपक आगवणे यांनी शालेय वयात एका आध्यात्मिक कार्यक्रमात कुरुक्षेत्रावरील कृष्णार्जुन संवाद असलेले नाटक सादर करणे आणि त्याचे प्रेक्षकांनी पुष्कळ कौतुक करणे :
माझा मोठा भाऊ दीपकदादा (श्री. दीपक आगवणे) नववीत आणि मी सातवीत असतांना दीपकदादाने कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्ण-अर्जुन संवादावरील एक नाटिका लिहिली आणि बसवली होती. नाटिकेत ‘शत्रूपक्षात आप्तजनांना पाहून अर्जुन निराश झाल्यावर श्रीकृष्णाने त्याला गीतोपदेश केला. त्यामुळे ‘अर्जुनाला चिरंतन सत्याचा साक्षात्कार होऊन तो पुन्हा संपूर्ण उत्साहाने अधर्माशी लढायला सिद्ध झाला’, असा प्रसंग सादर केला होता.
मुंबईतील एका मैदानात एक आध्यात्मिक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात आम्हाला ही नाटिका सादर करण्याची संधी मिळाली. आम्ही साधारणपणे ५ सहस्र प्रेक्षकांसमोर ही नाटिका सादर केली. या नाटिकेत दीपकदादाने श्रीकृष्णाची आणि मी अर्जुनाची भूमिका केली होती. त्या नाटकाला चित्रपटसृष्टीतले एक मेलडी वाद्य (accordion) वाजवणारे वादक ‘श्री. सतीश बोंतल’ उपस्थित होते. ते आमच्या बाबांना म्हणाले होते, ‘‘तुमची मुले गुणी आहेत. ती या क्षेत्रात पुष्कळ पुढे जातील.’’
२ आ. गुरुकृपेने त्या लहान वयातही ब्राह्मतेजयुक्त संवाद म्हणता येणे : नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतल्यावर माझ्या लक्षात आले, ‘कुणीही काहीही न शिकवता दीपकदादा श्रीकृष्णाचे संवाद म्हणायचा. त्यात ब्राह्मतेजाची सात्त्विकता आणि कृष्णाचे अस्तित्व जाणवत होते !’ माझीही अर्जुनाची भूमिका आणि संवाद क्षात्रवृत्तीने भारित होते. दीपकदादाच्या रूपातून गुरुमाऊलींनीच ते आम्हाला शिकवले आणि त्यांनीच ते आमच्याकडून करून घेतले. त्यांच्या कृपेनेच तेथील प्रेकक्षकांनी आमचे तोंड भरून कौतुकही केले.
या नाटिकेच्या परिणामस्वरूप गुरुकृपेने बालवयातच आमच्या नकळतच आम्हाला गीतेतील अमूल्य उपदेश कळला. आता असे वाटते, ‘तेव्हा गुरुमाऊली स्थूल रूपात आमच्या समवेत नसली, तरी आमच्या परमभाग्याने आमच्या बालवयापासूनच ती सूक्ष्मातून आमच्या साधनेचा पाया सिद्ध करत होती !’
३. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्रात आल्यामुळे गुरुरूपातील कृष्ण आणि संत मीराबाईंप्रमाणे भक्ती असलेल्या संतांची मांदियाळीच भेटणे
एकदा मला संत मीराबाईंची भूमिका करायची होती. तेव्हा दीपकदादाने मला संत मीराबाईंची माहिती उत्तम प्रकारे समजावून सांगितली. या भूमिकेच्या माध्यमातून देवाने ‘ईश्वरप्राप्तीसाठी तळमळ कशी असायला पाहिजे ?’, हे मला शिकवले. तेव्हा मला वाटायचे, ‘संत मीराबाई संपूर्ण आयुष्यभर प्रत्येक क्षणाला केवळ श्रीकृष्णाचाच विचार करत असत. कधी मला त्या भेटल्या, तर मी त्यांना नक्कीच विचारीन, ‘काय केल्यावर प्रत्येक क्षणाला माझ्या मनात केवळ देवाचाच विचार असेल ?’
तेव्हा ‘मला संत मीराबाई भेटल्या, तर..’ असे वाटले होते; पण माझ्या भाग्याने देवाने मला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्रात आणून गुरुमाऊलींच्या रूपात प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि संतांची मांदियाळीच भेटवली !’
– सौ. शुभांगी रामचंद्र शेळके, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
(क्रमशः)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/762610.html