सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याविषयी साधकांना जाणवलेली सूत्रे
१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर हात दुखण्याचा त्रास दूर होऊन शांत झोप लागणे
अनुमाने ३ मासांपासून मला डावा हात पूर्ण वर करता येत नव्हता. हात वर करतांना माझ्या हातात वेदना होत असत. मला साडी नेसतांना अडचण येत होती. वेणी घालतांना आणि पोशाख घालतांना माझ्या हातात वेदना होत असत. मला रात्री शांत झोप लागत नसे. त्यामुळे माझे पित्त वाढत असे. या त्रासांसाठी मी आयुर्वेदानुसार औषधोपचार घेत होते; मात्र ती औषधे मला लागू पडत नव्हती.
मला होत असलेले त्रास दूर होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप प्रतिदिन १ घंटा करायला सांगितला. आयुर्वेदाची औषधे घेण्यासमवेत १०.९.२०२२ या दिवसापासून मी हा नामजप करू लागले. मी हा नामजप ३ – ४ मास केल्यावर माझा त्रास ५० टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाला. मार्च मासापर्यंत मला डावा हात पूर्णपणे वर करता आला. आता मला शांत झोप लागते.
– सौ. सुनिता गांवकर, पुणे (६.५.२०२३)
२. आध्यात्मिक उपाय शोधत असतांना सद्गुरु गाडगीळकाकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
अ. सद्गुरुकाका देवाशी एकरूप होऊन साधकांसाठी नामजपादी उपाय शोधतात. त्या वेळी ते त्या साधकाशीही एकरूप झालेले असतात. त्यामुळे त्यांना सर्व गोष्टी सहजतेने लक्षात येतात आणि त्याप्रमाणे ते उपाय सांगतात. अशा वेळी त्यांना स्वतःचे अस्तित्व जाणवत नसते.
आ. नामजपादी उपाय शोधतांना सद्गुरु काका बर्याच वेळा सहजावस्थेत असतात.
इ. नामजपादी उपाय शोधण्याच्या वेळी त्यांच्यात अहंचा लवलेशही नसतो. त्यामुळे ‘भगवंत त्यांच्या माध्यमातून एवढे मोठे कार्य करतो’, असे माझ्या लक्षात आले.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ काकांसारखे संतरत्न आम्हाला दिले, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१०.२०२०)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |