एन्.एस्.एस्.मधील योगदानाबद्दल पत्रकार मकरंद पटवर्धन यांचा सन्मान
रत्नागिरी – येथील पत्रकार श्री. मकरंद पटवर्धन यांना त्यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक योगदानाबद्दल येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या एन्.एस्.एस्. विभागाकडून सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या बारावीतील स्वयंसेवकांचा सदिच्छा समारंभ पार पडला. राष्ट्रीय सेवा योजनेतून बाहेर पडलेल्या आणि समाजामध्ये चांगले काम करणार्या माजी विद्यार्थ्यांचा प्रतिवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षी श्री. पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला.
या समारंभात अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर म्हणाले, ‘‘आपल्या महाविद्यालयात एन्.एस्.एस्.चे काटेकोर नियोजन आणि उत्तम कार्यक्रम चालू आहेत. विद्यार्थ्यांनी नेहमी कोणत्याही क्षेत्रात काम करतांना ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करावा. तुमचे समाजासाठी योगदान असेलच. आयुष्यात सर्व प्रकारच्या परीक्षांना शांतपणे धीरोदात्तपणे सामोरे जा. एन्.एस्.एस्. बंधुभावाला कधीही विसरू नका. महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा.’’
या वेळी व्यासपिठावर कला विभागप्रमुख प्रा. वैभव कानिटकर, विज्ञान विभागप्रमुख प्रा. दिलीप शिंगाडे, एन्.एस्.एस्.चे माजी कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रभात कोकजे, प्रा. निनाद तेंडुलकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रा. कानिटकर यांनी सांगितले की, महाविद्यालयात प्रवेश एन्.एस्.एस्.च्या शिबिरामध्ये व्यक्तीमत्त्व विकास, तडजोड, नियोजन अशा सर्वच गोष्टी शिकायला मिळतात. एका वारकर्याला दुसरा वारकरी भेटल्यानंतर जसा आनंद होतो, तसाच आनंद एन्.एस्.एस्.चे माजी विद्यार्थी एकमेकांना भेटल्यानंतर होतो.