प्रतापगडच्या संवर्धनामध्ये कडप्पा दगडाचा उपयोग !
शिवप्रेमींनी बंद पाडले काम
(‘कडप्पा’ हा विशिष्ट प्रकारचा दगड असून तो बांधकामासाठी वापरला जातो.)
सातारा – शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत असलेला प्रतापगडचा एकेक बुरुज ढासळत आहे. गडावरील अनेक ठिकाणचे दगड निखळले असून संवर्धनाची आवश्यकता आहे. प्रतापगडच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारकडून १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यांतील १३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होऊन कामाला प्रारंभही झाला आहे; मात्र प्रतापगडच्या संवर्धनासाठी कडप्पाचा उपयोग करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. काही जागृत शिवप्रेमींनी हे तकलादू संवर्धनाचे काम बंद पाडले आहे. (या माध्यमातून गडाचे विद्रूपीकरण करणार्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे ! – संपादक)
१. पुरातत्व विभागाच्या नियमानुसार ऐतिहासिक वारसा जपायचा असेल, तर ती वास्तू ज्या पद्धतीत बांधली असेल, त्याप्रमाणेच दुरुस्त केली पाहिजे. त्यामध्ये कुठेही आधुनिकता नसावी; मात्र तरीही प्रतापगडाचे काम करत असतांना संबंधित ठेकेदार आणि कामगार कडप्पा बसवत आहेत. यामुळे गडाचे मुख्य सौंदर्य लोप पावत आहे.
२. चुकीच्या पद्धतीने संवर्धन होत असल्याचे समजताच शिवप्रेमींनी प्रतापगड येथे धाव घेत बांधकाम बंद पाडले आहे. पुरातत्व विभागाच्या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
प्रतापगड हा जागतिक वारसा स्थळाच्या नामांकन सूचीत आहे. यामुळे प्रतापगड येथे होणारी सर्व कामे पुरातत्व विभागाच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे; मात्र गडाची मुख्य ओळख असणार्या ध्वज बुरुजाचे काम गत २ वर्षांपासून ‘सह्याद्री प्रतिष्ठान’च्या माध्यमातून लोकवर्गणी गोळा करून चालू आहे. प्रतिष्ठानच्या वतीने खासगी ठेकेदार नेमण्यात आला असून त्याच्याकडून नियमबाह्य काम केले जात आहे. बुरुजाच्या काही भागांचे काम काँक्रीटमध्ये केले असून ते झाकण्यासाठी कडप्प्याचा उपयोग करण्यात आला आहे. यापूर्वीही याच खासगी ठेकेदाराकडून कामामध्ये चक्क थर्माकॉलचा उपयोग करण्यात आला होता. यामुळे ठेकेदाराने केलेल्या सर्वच कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत. |
संपादकीय भूमिका
|