अयोध्येमध्ये राहिलेले काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेशाकडे प्रार्थना करायची आहे ! – श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी

पुणे येथील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’च्या वतीने शंकराचार्यांचे स्वागत आणि सन्मान !

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करतांना श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी महाराज

पुणे – भारतामध्ये धर्मासाठी मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे. अयोध्येमध्येही चांगले काम झाले आहे आणि अजून होणे बाकी आहे. आणखी जे राहिलेले काम आहे, ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेशाकडे प्रार्थना करायची आहे, असे श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांनी सांगितले. यांनी पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि महाआरतीही केली. या वेळी ते बोलत होते. या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने विश्वस्त, पदाधिकारी यांनी शंकराचार्य यांचा यथोचित स्वागत सन्मान केला. या वेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, विलास रासकर आदी उपस्थित होते.

सौजन्य पुणे दर्पण न्यूज 

श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी पुढे म्हणाले की, कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत आणि इतर देशांमध्ये गणपतीचे पूजन केले जाते. महाराष्ट्रामध्ये गणपतीची मुख्य उपासना केली जाते. पुणे येथून देशभक्ती आणि देवभक्तीचा उगम झाला. त्यामध्ये दगडूशेठ गणपति मंदिराचे मुख्य स्थान आहे. देशामध्ये सध्या होणार्‍या विकासाप्रमाणे आपल्या धार्मिक मूल्यांचे संवर्धन आणि रक्षण करणे आवश्यक आहे. असे कार्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने चालू आहे. आता धर्म, सेवा आणि संस्कार यांचे केंद्र होण्याच्या दिशेने मंदिर वाटचाल करत आहे. यापूर्वीच्या शंकराचार्यांनी गणपति मंदिराला भेट दिली होती. हीच परंपरा श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वरशंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांनी गणरायाचे दर्शन घेत चालू ठेवली आहे.