सिंधुदुर्ग : अरुणा धरणाचे काम प्रकल्पग्रस्तांनी रोखले
प्रशासनाकडून आश्वासनांची पूर्तता होत नसल्याचा आरोप
वैभववाडी (सिंधुदुर्ग) – जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जात नाही आणि प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही, तोपर्यंत येथे काम करू देणार नाही, असे सांगत संतप्त झालेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांनी ५ फेब्रुवारी या दिवशी येथे चालू केलेले अरुणा धरणाच्या कालव्याचे आणि अन्य कामे बंद पाडली.
अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांपैकी आखवणे येथील १६५ प्रकल्पग्रस्तांचे हेत किंजळीचा माळ येथे शासनाने पुनर्वसन केले आहे; मात्र तेथे पुनर्वसनाच्या अनुषंगाने कोणतीही कामे गेल्या ५ वर्षांत केलेली नाहीत. पुनर्वसन गावठाणासाठी स्वतंत्र विहीर खोदण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले आहे; मात्र यावरही अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. नळपाणी पुरवठा योजनेत वारंवार होणार्या बिघाडामुळे धरणग्रस्तांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेले ८ दिवस पुनर्वसन गावठाणातील नळयोजनेला पाणी आलेले नाही. पात्र लाभार्थ्यांना अद्याप भूखंड मिळालेले नाहीत, अशा अनेक मागण्या आहेत; मात्र त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ‘जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत, तोपर्यंत धरणाचे काम करू देणार नाही’, अशी चेतावणी धरणग्रस्तांनी दिली आहे.
(सौजन्य : Aruna Prakalp – Ajay Nagap) |
या वेळी माजी सरपंच सुरेश नागप, महादेव नागप, शिवाजी पडीलकर, सुनील नागप, मानाजी घाग, परशुराम पडीलकर, विनोद नागप, विजय नागप यांच्यासह किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील धरणग्रस्त उपस्थित होते.