India Energy Week Goa : भारताच्या ऊर्जा क्षेत्रात ६७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

बेतुल येथे राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी

पणजी, ६ फेब्रुवारी (वार्ता.) : भारताच्या ऊर्जा क्षेत्रात जगाने गुंतवणूक करावी. भारताच्या नजीकच्या काळात ऊर्जा क्षेत्रात ६७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे. जगात ऊर्जेची मागणी वाढत असतांना देशातील प्रत्येक कोपर्‍यात स्वस्त दरात ऊर्जा पोचवण्याचे काम देशात चालू आहे. वर्ष २०४५ पर्यंत देशात ऊर्जेचा वापर दुपटीने वाढणार आहे. मागील ६ मासांत भारताचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर (GDP – Gross Domestic Product) ७.५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. भारत सर्वांत वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था आहे. भारत लवकरच जगात तिसरी अर्थव्यवस्था बनणार, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनेही म्हटले आहे. यामध्ये ऊर्जेची सर्वांत मोठी भूमिका आहे. भारत जगातील तिसरा सर्वांत मोठा ऊर्जा, इंधन आणि घरगुती गॅस यांचा ग्राहक आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील साधनसुविधांचा अधिकाधिक निधी वीज क्षेत्रासाठी खर्च केला जाणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेतुल (मडगाव) येथे राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलतांना दिली.

या वेळी केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात विविध देशांमधील १७ ऊर्जामंत्र्यांनी सहभाग घेतला आहे, तर ३५ सहस्रांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी ९०० हून अधिक प्रदर्शने भरवली गेली आहेत. यामध्ये कॅनडा, जर्मनी, नेदरलँड, रशिया आणि इंग्लंड या देशांच्या प्रदर्शनांचा सहभाग आहे. यामध्ये ‘मेक इन इंडिया’ या नावानेही एक प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘‘देशात दुचाकी आणि चारचाकी यांची विक्री वाढत आहे आणि विक्रीचे विक्रम तोडले जात आहेत. दिवसागणिक विजेवर चालणार्‍या वाहनांची मागणी वाढत आहे. ऊर्जा सुरक्षा सप्ताहात पर्यावरणीय संवेदनशीलता आणि स्वयंपोषक भवितव्य या विषयांवर चर्चा होत आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे. भारत देश ऊर्जा क्षेत्रात अधिक शक्तीशाली होत चालला आहे. देशात घरगुती गॅसचा वापर वाढला आहे. ऊर्जा क्षेत्रात सातत्याने क्षमता वाढवली जात आहे. वर्ष २०४५ पर्यंत भारताची प्राथमिक ऊर्जा दुपटीने वाढणार आहे. गोवा विकासाच्या संदर्भात बरीच प्रगती करत आहे. गोमंतकियांचे आदरातिथ्य सर्वांसाठीच भारावून सोडणारे आहे.’’

गोव्यात काही वर्षांत सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे विजेवर चालणार्‍या वाहनांचा वापर ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात काही वर्षांत सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे विजेवर चालणार्‍या वाहनांचा वापर केला जाणार आहे.

त्याचबरोबर सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी जनतेमध्ये जागृती करण्यात येणार आहे. वर्ष २०३५ पर्यंत ६० टक्के सौर आणि पवन ऊर्जानिर्मिती करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

क्षणचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ओ.एन्.जी.सी.’च्या (तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या) ‘इंटीग्रेटेड सी सर्व्हाइव्हल’ प्रशिक्षण केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले.

या ठिकाणी प्रतिवर्ष १० ते १५ सहस्र विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत.