पनवेल तालुक्यात शासनमान्यता नसलेल्या ३० शाळा चालूच !
२३ प्राथमिक आणि ७ माध्यमिक शाळा अस्तित्वात
पनवेल – पनवेल तालुक्यात सरकारच्या मान्यतेविना चालू असणार्या अवैध शाळांवर अद्यापही बंदी आणण्यात आलेली नाही, तसेच त्या शाळांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे यंदा पुन्हा शासनमान्यता नसलेल्या शाळांची सूची शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली असून केवळ पालकांनाच आवाहन केले आहे.
सध्या पनवेल तालुक्यात शासनमान्यता नसलेल्या २३ प्राथमिक आणि ७ माध्यमिक शाळा चालू आहेत. शिक्षण विभागाची अनुमती नसलेल्या शाळांची नावे असणारे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. संबंधित संस्थेच्या नावासह काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात फौजदारी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे. ‘पालकांनी संबंधित शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, भविष्यात पाल्यांची शैक्षणिक हानी झाल्यास शिक्षण विभाग उत्तरदायी रहाणार नाही’, असे आवाहनही यात करण्यात आले आहे.
बेकायदा शाळा चालू ठेवल्याविषयी १ लाख रुपये आणि प्रतिदिवस १० सहस्र रुपये अशा दंडाच्या नोटिसा देण्यात आल्या; परंतु तालुक्यातील ३० बेकायदा शाळांपेकी एका शाळेनेही १ रुपयाचाही दंड भरलेला नाही. प्रतिशाळा सुमारे २ ते ३ लाख रुपयांचा दंड प्रलंबित आहे. (हा दंड कधीपर्यंत वसूल करणार, हेही समजायला हवे ! – संपादक)
संपादकीय भूमिका :शिक्षण विभाग आणि प्रशासन यावर कधी नियंत्रण आणणार ? बेकायदेशीर शाळा स्थापन करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्या संबंधितांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! |