पुणे येथील ‘माय कॉलेज खोज’ आस्थापनाच्या संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद !
परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थेत प्रवेशाचे आमीष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक !
पुणे – परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी विमाननगरमधील ‘माय कॉलेज खोज’ या आस्थापनाच्या संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी महाविद्यालयीन तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून दोघांना अटक करण्यात आली. आरोपींनी ४-५ विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि विमानतळ पोलिस यांनी ‘माय कॉलेज खोज’ आस्थापनाच्या कार्यालयात धाड घातली. (विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्या अशा आस्थापनांविरुद्ध कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक)
तरुणीला उच्चशिक्षणासाठी इटलीला जायचे होते. तिने परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांची माहिती शोधतांना ‘माय कॉलेज खोज’ या आस्थापनाच्या संकेतस्थळावर ‘परदेशात उच्चशिक्षणाची संधी’, असे विज्ञापन तिने पाहिले. इटलीचा ‘व्हिसा’ आणि शिक्षणासाठी साहाय्य करण्याचे सांगून तिच्याकडून २ लाख ६ सहस्र रुपये घेण्यात आले. संशय आल्याने तिने चौकशी केली, तेव्हा ४-५ विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले.