मनुष्य देह-वाणी शुद्ध करण्याचे एकच साधन म्हणजे ‘भगवंताचे नाम’ ! – ह.भ.प. वासुदेव महाराज गुरव    

पोफळी नाका, सरफरेवाडी, होडेवाडी ग्रामस्थ मंडळी (ता. चिपळूण) आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची आज होणार सांगता


चिपळूण – मनुष्याचा उद्धार त्याच्या संगतीवर अवलंबून आहे. साधूसंतांच्या संगतीने जिवांचा उद्धार होतो. संत आपल्यातील अज्ञान घालवतात आणि स्व-स्वरूपाची ओळख करून देतात. संतसंगतीने अर्थात् संतांच्या सत्संगाने आत्मज्ञान प्रकट होते. प्राप्त होते. मनुष्याचे शरीर अनेक रोगांचे, षडरिपुंचे भांडार आहे. हा देह-वाणी पवित्र आणि शुद्ध करण्याचे एकच साधन म्हणजे ‘भगवंताचे नाम’ होय. कलियुगात नामस्मरण हा सोपा साधना मार्ग आहे. नामस्मरणाने भगवंताशी सततचे अनुसंधान साधले जाते, असे मार्गदर्शन तालुक्यातील पिंपळी येथील ह.भ.प. वासुदेव महाराज गुरव यांनी पोफळी नाका येथील श्री हनुमान मंदिरात कीर्तन महोत्सवात केले.

पवित्र सोवळी । एक तीच भूमंडळी ।। ज्यांचा आवडता देव। अखंडित प्रेमभाव ।।

या संत तुकोबारायांच्या अभंगावर त्यानी निरूपण केले. या कार्यक्रमाचे नियोजन सप्ताह समितीचे अध्यक्ष श्री. दादासाहेब साळवी, सचिव श्री. श्रीराम पवार यांनी वारकरी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने उत्तम केले होते. या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ७ फेब्रुवारी या दिवशी होत आहे.

ह.भ.प. वासुदेव महाराज गुरव पुढे म्हणाले,  

१. या भूमंडळावर पवित्र आणि सोवळे कोण आहे? ज्यांच्या ठायी देव आहे, ज्यांच्या चित्तात देवाची (नामाची) आवड आहे, प्रेमभाव आहे, विकार नाहीत, ते पवित्र-सोवळे संत होय. अशांची सेवा केली, तर ती देवापर्यंत पोचते.

२. भगवंताविषयी मनात भाव असेल, तर भगवंत भक्ताकडे येतो. साधूसंतांच्या आश्रमात सेवा केल्याने लवकर पवित्रता निर्माण होते.

३. जगाचे कल्याण व्हावे, आनंदी व्हावे, अशी दृष्टी साधू-संतांची असते.

या सप्ताह सोहळ्यात ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि प्रतिदिन सायंकाळी कीर्तन याचे आयोजन करण्यात आले होते. याचा पंचक्रोशीतील भाविक आणि वारकरी यांनी लाभ घेतला.