पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तत्परतेने उपचार करा !
|
पुणे – कथित आरोपाखाली मागील ११ वर्षांपासून जोधपूर कारागृहात असलेल्या ८६ वर्षीय पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची प्रकृती चिंताजनक आहे. कारागृहात जाण्यापूर्वी वयाच्या ७४ व्या वर्षी संतश्री आसारामजी बापू यांना ‘ट्रायजेमिनल न्युरेल्जिया’ (चेहर्याच्या ठिकाणी होणार्या प्रचंड वेदना) आणि पाठदुखी यांचा त्रास होत होता. आता वयाच्या ८६ व्या वर्षी ते हृदयविकार, प्रोस्टेट वाढणे, संधीवात आणि अशक्तपणा इत्यादी नवीन आजारांनी ग्रासले आहेत. ‘एम्स’च्या अहवालानुसार त्यांच्या हृदयात ३ गंभीर ‘ब्लॉकेज’ आहेत, तसेच हिमोग्लोबिनची पातळी सतत घसरत असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत आहे. त्यांची गंभीर शारीरिक स्थिती पहाता ‘पॅरोल’साठी (अभिवचनावर तात्पुरती सुटका) नुकताच प्रविष्ट केलेला अर्ज आजाराच्या तीव्रतेकडे दुर्लक्ष करून रहित करण्यात आला. बापूजींना तणावमुक्त वातावरणात अनुकूल, उत्तम आणि त्वरित योग्य उपचार मिळावेत, अशी मागणी ‘संत श्री आसारामजी आश्रम अहमदाबाद सत्संग वक्ता’ श्री. रामानंदजी आणि ‘महिला उत्थान मंडल अहमदाबाद सत्संग वक्ता’ साध्वी रेखा बहनजी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
श्री योग वेदांत सेवा समिती आयोजित ‘मातृ-पितृ पूजन दिवस महती’ आणि ‘संत श्री आसारामजी बापू यांच्या आरोग्याची सद्यःस्थिती’ यांसंदर्भात पुणे पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली.
या वेळी संत श्री आसारामजी आश्रम महाराष्ट्र राज्य महासंचालक श्री. सत्येंद्र कालियाजी, श्री योग वेदांत सेवा समितीचे पुणे अध्यक्ष श्री. चेतन चरवड, समस्त हिंदू आघाडी पुण्याचे अधिवक्ता मोहन डोंगरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, स्वराज श्रमिक सेना श्री. सुजीत बंक आदी उपस्थित होते.
या वेळी साध्वी रेखा बहनजी म्हणाल्या की, माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्यावर ‘पॉक्सो’ कायद्याच्या कलमाखाली आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंद असतांनाही आधी तब्येतीच्या कारणास्तव अन् नंतर त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी जामीन संमत होतो. त्याचप्रमाणे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, देहलीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला, महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक अशांना, तसेच हत्या, बाँबस्फोट यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी आणि गुन्हेगारांनाही दिलासा दिला जातो; पण संत श्री आसारामजी बापूंना त्यांच्या इच्छेनुसार योग्य उपचार मिळण्यापासून वंचित का ठेवले जात आहे ? आदरणीय बापूजींना वैद्यकीय उपचार तातडीने न मिळाल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभे करावे लागेल.
भारतीय परंपरेचे पुनर्जागरण करण्यासाठी ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ ! – चेतन चरवड, पुणे अध्यक्ष, श्री योग वेदांत सेवा समितीभारतीय परंपरेचे पुनर्जागरण आणि मुलांवर संस्कार करण्यासाठी १४ फेब्रुवारीला ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ आयोजित करण्यात येतो. याद्वारे मुलांमध्ये पालकांप्रती आदराचे संस्कार रुजवावेत, आई-वडिलांचा आशीर्वाद आणि अनुभव घेऊन चांगल्या जीवनाकडे वाटचाल करण्याचा संदेश दिला जातो. ‘१४ फेब्रुवारी हा खरा प्रेमदिन साजरा करावा’; म्हणून संत श्री आसारामजी बापूंच्या पवित्र प्रेरणेतून श्री योग वेदांत सेवा समिती गेल्या १४ वर्षांपासून देश-विदेशात ‘मातृ-पितृ पूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, राज्यपाल आदींनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. छत्तीसगड सरकारने ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ हा राज्याचा सण घोषित केला आहे. |