स्त्रियांचा सन्मान !
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत आहे. राज्य मंत्रीमंडळानेही यास मान्यता दिली आहे. राज्यात नाव लिहितांना स्वतःचे नाव, नंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लिहिण्याची प्रथा यामुळे मोडीत निघणार आहे. नवीन धोरणानुसार यापुढे आता वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लिहिणे बंधनकारक असणार आहे.
मागील काही वर्षांपासून संपूर्ण नाव लिहितांना आपल्या नावानंतर वडिलांचे नाव लिहिण्याआधी आईचे नाव लिहिण्याची पद्धत विद्रोही किंवा पुरोगामी तरुण-तरुणींनी अंगीकारली होती. त्यानंतर काही जण तर नावापुढे वडिलांचे नाव न लावता केवळ आईचेच नाव लिहू लागले. नव्याने मंत्रीमंडळात सहभागी झालेल्या काही युवा मंत्र्यांमध्येही हा ‘ट्रेंड’ (नवीन पद्धत) आला आहे. राज्यातील काही मंत्र्यांनी शपथ घेतांना आपल्या नावापुढे आपल्या आईचेही नाव जोडले. यालाच आता राज्य सरकारने अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘यामुळे स्त्रियांचा सन्मान राखला जाणार आहे’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे बोलतांना स्पष्ट केले आहे. ‘या निर्णयामुळे व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलणार्या ‘आई’चा सन्मान होणार आहे’, असे काही जणांना वाटत आहे.
या निर्णयामुळे पुढे कदाचित् अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. ते सोडवण्याची सिद्धताही करणे सरकारला क्रमप्राप्त ठरणार आहे. अनेक ‘ऑफलाईन’ (प्रत्यक्ष अर्ज देणे) आणि ‘ऑनलाईन’ अर्जांमध्ये संपूर्ण नाव लिहिण्यासाठी आतापर्यंत तीनच ओळी दिल्या जात होत्या. आता त्यासाठी ४ ओळी द्याव्या लागणार असल्याने अर्जाची नव्याने छपाई, तर ऑनलाईन अर्जामध्ये आवश्यक तो पालट करावा लागणार आहे. हा पालट केवळ राज्याच्या सीमेपुरता सीमित असेल, तर लोकांकडे सध्या असलेल्या सरकारी ओळखपत्रांमध्ये, उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट यांमध्ये पालट करायचा का ? असाही प्रश्न लोकांना पडू शकतो.
अविवाहित मुलींसाठी वरील नियम लागू होईलच; मात्र विवाहित स्त्रियांनी आपल्या नावापुढे पतीच्या नावाआधी आईचे नाव लावायचे का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होऊ शकतात. अर्थात् राज्य सरकारने या नवीन धोरणाला सध्या केवळ मान्यता दिली असून हे धोरण प्रत्यक्ष कार्यवाहीत आणण्याआधी सर्व प्रश्नांची उकल होईलच, अशी अपेक्षा करायला सध्या तरी हरकत नाही. गेल्या काही वर्षांपासून सरकारी कामांसाठी भराव्या लागणार्या विनंती अर्जामध्ये आईच्या नावाचा रकाना वाढवण्यात आला आहे. आईचे नाव आपल्या नावात येऊन तिचा सन्मान होईलच, तसाच तो तिला समाजात सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.