‘भाव जागृत होणे आणि भावातीत अवस्था’, याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधकाला केलेले मार्गदर्शन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. मार्गदर्शक साधकांनी ‘प्रत्येक दिवशी एकदा तरी डोळ्यांत भावाश्रू यायला हवेत’, असे सांगणे

‘वर्ष २००३ मध्ये आम्हा सर्वांना त्या वेळच्या मार्गदर्शकांनी सांगितले होते, ‘‘प्रत्येक दिवशी एकदा तरी डोळ्यांत भावाश्रू यायला हवेत.’’त्यानंतर मी नगर येथे काही वर्षे स्थायिक होतो. मी भावजागृती होण्यासाठी (डोळ्यांत भावाश्रू येण्यासाठी) प्रतिदिन पुढील श्लोक एकदा भावपूर्ण वाचण्याचा प्रयत्न करत असे.

२. श्लोकातील शेवटच्या २ ओळी वाचतांना डोळ्यांत भावाश्रू येणे

श्री. अरुण डोंगरे

ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ।।

अर्थ : ‘ब्रह्मरूप, आनंदरूप, परमोच्च सुख देणारे, केवळ ज्ञानस्वरूप, द्वन्द्वरहित, आकाशाप्रमाणे (निराकार), ‘तत्त्वमसि’ या महावाक्याचे लक्ष्य (‘ते तू आहेस’, असे वेदवाक्य ज्याला उद्देशून आहे ते), एकच एक, नित्य, शुद्ध, स्थिर, सर्वज्ञ, सर्वसाक्षी, भावातीत, गुणातीत असलेल्या अशा सद्गुरुंना मी नमस्कार करतो.’यातील ‘भावाच्या पलीकडे गेलेल्या आणि त्रिगुणातीत अशा गुरूंना मी नमन करतो’, या अर्थाची शेवटची ओळ वाचली की, माझ्या डोळ्यांत अश्रू येत असत.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला ‘प्रयत्नपूर्वक भावातीत व्हायला हवे’, असे सांगणे

वर्ष २००५ मध्ये एकदा मी नगर येथून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दूरभाष करून या प्रसंगाविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘आता भावामुळे डोळ्यांत पाणी यायला नको. भावातीत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. काही विशिष्ट प्रसंगी डोळ्यांत येणार्‍या अश्रूंना थांबवायला नको; पण प्रयत्नपूर्वक भावातीत व्हायला हवे.’’

– श्री. अरुण डोंगरे (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक