साक्षीत्व
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे मौलिक विचारधन !
‘साक्षी ही अवस्था विलक्षण विलोभनीय आहे. येथे शुद्ध विश्रांती आहे, परम विश्राम आहे. नाना योनी भटकून परिश्रांत झालेला असा जीव, ज्या वेळी त्या साक्षीत्व दशेला प्राप्त होतो, तेव्हा त्याचे संसार भ्रमण थांबते. साक्षीत्व म्हणजे शिवत्व ! साक्षीत्व म्हणजे परम शांती ! येथे कुठलाच विक्षेप नाही, क्षुब्धता नाही.
जन्म जन्म जर्जर झालेला जेव्हा साक्षीत्वाला पोचतो, तेव्हा परम विश्रांतीला प्राप्त होतो. अनेक जन्मजन्मांची पीडा, भटकंती, उपद्रव, धुमाकूळ हे सर्व अस्ताला जाते. साक्षीत्व ही परमस्वतंत्रता आहे. ही स्थितप्रज्ञता ! साक्षीत्व रोमरोमी भिनले, श्वासाश्वासांत सामावले की, त्याचा प्रपंच्याचा भ्रम संपतो. निःसंगता परम आहे, हे तो जाणतो. आता त्याला अपवित्रता कशी स्पर्श करील ? आता पाप, विकार आणि अमंगल यांचे भयच नाहीसे होते. आता तो जे बोलेल, ती भगवंताची वाणी असते. परमेश्वरच त्याच्याकरवी सर्व करून घेतो; म्हणूनच साक्षीत्व हेच शिवत्व आहे.’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०२३)