अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या मंदिरात श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा विधीचे सुश्री मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
२२.१.२०२४ या दिवशी अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या मंदिरात श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम दूरदर्शन वाहिनीवरून थेट प्रक्षेपित झाला. हा दिव्य सोहळा पहात असतांना देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे. ६ फेब्रुवारीला या सूक्ष्म परीक्षणातील काही सूत्रे आपण पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.
१२. श्री रामललाच्या आरतीच्या ज्योतींमध्ये सूर्यलोकातील दिव्य ज्योती कार्यरत होणे आणि ही दिव्य आरती ओवाळण्यासाठी ब्रहर्षि वसिष्ठांच्या समवेत सत्यलोकातून सप्तर्षी प्रभु श्रीरामाच्या मंदिरात सूक्ष्मातून प्रगट झाल्याचे जाणवणे
पंतप्रधान मोदी प्रभु श्रीरामाची आरती करत असतांना सूर्यलोकातील दिव्य ज्योती पृथ्वीवर आल्या आणि त्या आरतीतील स्थुलातील ज्योतींशी एकरूप झाल्या. त्यामुळे या ज्योतींना दिव्यता प्राप्त झाली. या प्रज्वलित झालेल्या दैवी ज्योतींच्या दिव्य आरतीने प्रभु श्रीरामाची आरती केली. तेव्हा ही दिव्य आरती ओवाळण्यासाठी सत्यलोकातून ब्रहर्षि वसिष्ठांच्या समवेत सप्तर्षी प्रभु श्रीरामाच्या मंदिरात सूक्ष्मातून प्रगट झाल्याचे जाणवले. सूक्ष्मातून सप्तर्षी श्री रामललाच्या मूर्तीची आरती करत असतांना पृथ्वीच्या आकाशमंडलात जमलेल्या विविध देवतांनी हात जोडून प्रभु श्रीरामाचे ध्यान केले आणि विविध ऋषींनी चारही वेदांतील मंगलमय मंत्र म्हटले. आरतीच्या वेळी श्री रामललाच्या मूर्तीतून सूक्ष्मातून आनंदाचे कारंजे उडाले. त्यामुळे पृथ्वीच्या आकाशमंडलात सूक्ष्मातून सप्तरंगी इंद्रधनुष्य प्रगटले आणि पृथ्वीचे वायूमंडल रामतत्त्वाने भारित झाले.
१३. विविध संत आणि रामभक्त यांनी श्री रामललाच्या मूर्तीचे भावपूर्ण दर्शन घेतल्यामुळे मूर्तीमध्ये प्रभु श्रीरामाचे तत्त्व अधिकाधिक प्रमाणात जागृत होणे
प्राणप्रतिष्ठा विधीनंतर जेव्हा विविध संत श्री रामललाचे भावपूर्ण दर्शन घेत होते, तेव्हा श्री रामललाच्या मूर्तीमध्ये श्रीविष्णूचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात जागृत झाले. तेव्हा मूर्तीच्या डोळ्यांतून विष्णुतत्त्वमय निळसर रंगाचा प्रकाशाचा झोत सभोवतालच्या वायूमंडलात प्रक्षेपित होत होता. जेव्हा प्रभु श्रीरामाचे भक्त अत्यंत भक्तीभावाने श्री रामललाचे दर्शन घेत होते, तेव्हा श्री रामललाच्या मूर्तीतून वात्सल्यमय गुलाबी रंगाची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होऊन ते प्रीतीमय दृष्टीने त्यांचा कृपाकटाक्ष भक्तांवर टाकत होते. त्यामुळे भक्तांना प्रत्यक्ष भगवंताला पाहिल्याचा आनंद होत होता. काकभुशुंडीऋषि, वाल्मीकिऋषि, विश्वामित्रऋषि, ब्रह्मर्षि वसिष्ठ इत्यादी ऋषींनी श्री रामललाचे सूक्ष्मातून दर्शन घेतल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे हनुमान, शबरी, अहल्या, सुग्रीव, बिभीषण, जांबुवंत, जटायू, गरुड, सुदर्शनदेवता, शेषनाग लक्ष्मण, भरत इत्यादीही श्री रामललाच्या दर्शनासाठी वैकुंठातून भूतलावर आल्याचे जाणवले. सूक्ष्मातून आलेल्या या रामभक्तांना पाहून श्री रामललाला ब्रह्मानंद झाल्याचे जाणवले. ‘श्री रामललाच्या मंदिरात सूक्ष्मातून चालू असलेला भक्त आणि भगवंत यांच्या भेटीचा हा भक्तीमय सोहळा केवळ अनुभवत रहावा’, असे वाटत होते.
१४. ‘श्री. अरुण योगीराज यांनी भक्तीभावाने बनवलेली श्री रामललाची मूर्ती परिपूर्ण आहे’, याची अनुभूती येणे
श्री रामललाची मूर्ती पाच वर्षांच्या मुलाच्या रूपातील आहे. त्यामुळे या मूर्तीच्या डोळ्यांकडे पाहून काही रामभक्तांचा वात्सल्यभाव जागृत होत होता. तेव्हा प्रभु श्रीरामाने उजव्या हातातील बाणातून शक्ती आणि डाव्या हातात धारण केलेल्या ‘कोदंड’ या धनुष्यातून चैतन्य प्रक्षेपित झाल्याचे जाणवले. रामबाणाकडे पाहून ‘एकाग्रता’ आणि कोदंड धनुष्याकडे पाहून ‘पराक्रम’ या भगवंताच्या दैवी गुणांचे स्मरण होऊन श्री रामललाप्रतीचा आदरभाव वृद्धींगत होत होता. मूर्तीवरील मंद स्मितहास्यामध्ये आनंदाची स्पंदने जाणवत होती, तर तिच्या चरणांचे दर्शन घेतांना शांतीची अनुभूती येत होती. अशा प्रकारे श्री रामललाची मूर्ती ही शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या पाचही घटकांची अनुभूती येत असल्यामुळे ‘श्री. अरुण योगीराज यांनी भक्तीभावाने बनवलेली श्री रामललाची मूर्ती परिपूर्ण आहे’, याची अनुभूती येते.
१४ अ. श्री रामललाच्या मूर्तीकडे पाहून रामभक्तांना येणार्या विविध प्रकारच्या अनुभूती
१५. प्राणप्रतिष्ठेच्या दिव्य सोहळ्याची सांगता होणे
प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या वेळी श्री रामललाच्या मूर्तीच्या ठिकाणी काही वेळा श्रीविष्णूचे अंशावतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बालकरूपाचे दर्शन होत होते. त्यामुळे श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा दिव्य सोहळा पहाण्यासाठी स्थुलातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपाने भूदेवी आणि श्रीचितशक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या रूपाने श्रीदेवी अयोध्येत आल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे सूक्ष्मातून श्री गणेश, शिव, पार्वती, श्री सरस्वतीदेवी आणि ब्रह्मदेव अयोध्येतील श्री रामललाच्या, म्हणजे प्रभु श्रीरामाच्या बालकरूपाची प्राणप्रतिष्ठा आणि दर्शन सोहळा यांत सहभागी झाले होते. प्राणप्रतिष्ठेचे विधी पूर्ण झाल्यानंतर सूक्ष्मातून विविध लोकांतून आलेले प्रभु श्रीरामाचे सर्व भक्त आणि विविध देवदेवता त्यांच्या त्यांच्या लोकात गेल्याचे जाणवले. श्री रामललाच्या रक्षणासाठी मंदिरावर लावलेल्या कपिध्वजामध्ये हनुमानाचे एक सूक्ष्म रूप विलीन झाल्याचे जाणवले.
१६. पृथ्वीवर रामराज्याची स्थापना होण्यासाठी धर्माचरणी आणि साधना करणार्या रामभक्तीरूपी आदर्श प्रजेच्या निर्मितीची प्रक्रिया चालू झालेली असणे
श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभु श्रीरामाच्या मूर्तीतून संपूर्ण विश्वात धर्मशक्ती आणि चैतन्य यांचे मोठ्या प्रमाणात प्रक्षेपण चालू झालेले आहे. याचा परिणाम वायूमंडलावर होऊन पृथ्वीच्या संपूर्ण वायूमंडलाची शुद्धी होऊन संपूर्ण वायूमंडल राममय होणार आहे. त्यामुळे पृथ्वीवर रहाणार्या जिवांवरील त्रासदायक काळे आवरण नष्ट होऊन त्यांच्याकडून धर्माचरण होणार आहे. तसेच पृथ्वीवरील जिवांची सात्त्विकता वाढून त्यांना श्री रामललाच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण करता येणार आहे. अशा प्रकारे पृथ्वीवर रामराज्याची स्थापना होण्यासाठी धर्माचरणी आणि साधना करणार्या रामभक्तरूपी आदर्श प्रजेच्या निर्मितीची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यामुळे आधी समस्त रामभक्तांच्या हृदयात सूक्ष्मातून आणि त्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर स्थुलातून सर्वार्थाने आदर्श असणार्या रामराज्याच्या स्थापनेची प्रक्रिया आरंभ झालेली आहे. – सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२४)
प्रभु श्रीरामाच्या चरणी अर्पिते ही काव्यसमुनांजली !
मनात राम, रोमरोमात राम ।
श्वासात राम, प्राणात आत्माराम ।। १ ।।
हिंदूंचे प्रिय दैवत प्रभु श्रीराम ।
सीतेचे रघुवर सीताराम ।। २ ।।
विष्णुतत्त्वाचे प्रतीक असे शाळीग्राम ।
आदर्श राजाचे प्रतीक असे राजाराम ।। ३ ।।
श्रीरामप्रभूंना करते प्रणाम ।
श्रीराम जय राम जय जय राम ।। ४ ।।
– सुश्री मधुरा भोसले, रामनाथी, गोवा.
|