Investment India First Choice : व्यावसायिक जगताचे गुंतवणुकीचे पहिले स्थान ‘भारत’ !
नवी देहली – चीनची अर्थव्यवस्था गेल्या दोन दशकांत रॉकेटच्या गतीने वाढली. या काळात जगभरातील गुंतवणूकदारांनी तेथे भरपूर पैसा गुंतवला. असे असले, तरी आता परिस्थिती पालटली असून चिनी अर्थव्यवस्था संघर्ष करत आहे, तर भारताच्या अर्थव्यवस्थेला सुगीचे दिवस आले आहेत. अनेक जागतिक आस्थापनांनुसार आज व्यावसायिक जगताचे गुंतवणुकीचे पहिले स्थान हे भारत आहे.
१. ‘गोल्डमन सॅक्स’ आणि ‘मॉर्गन स्टॅन्ले’ या जागतिक बँकांनी भारताचे वर्णन ‘पुढील दशकासाठी भारत हे गुंतवणूकदारांसाठी सर्वांत मोठे गंतव्यस्थान !’, अशा प्रकारे केले आहे.
२. इंग्लंडचे आस्थापन ‘मार्शल वेस’च्या मते अमेरिकेनंतर भारतात सर्वांत मोठा ‘हेज फंड’ आहे. ‘हेज फंड’ म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवसायांसाठी गुंतवणूक करणारा पैसा. भारतातील सशक्त वाढ आणि राजकीय स्थिरता यांमुळे गुंतवणूकदार भारताकडे वळत आहेत. याचे एक उदाहरण, म्हणजे ‘आयफोन’च्या एकूण जागतिक उत्पादनात भारताचा वाटा ७ टक्के आहे.
India the first choice for investment in the business world !
✍🏻 Goldman Sachs and Morgan Stanley : These global banks have described India as the 'biggest destination for Investors for the next decade !'
✍🏻 Marshall Wace (England) : India has the largest hedge fund after the… pic.twitter.com/93V48GneT5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 6, 2024
पाश्चात्त्य देश आणि चीन यांच्यातील दरीत वाढ !
‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार भारत आज जगातील सर्वांत वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. दुसरीकडे चीनच्या अर्थव्यवस्थेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासह पाश्चात्त्य देशांशी चीनची दरी वाढत आहे.
सिंगापूरची ‘एम् अँड जी इन्व्हेस्टमेंट’चे वरिष्ठ अधिकारी विकास प्रसाद म्हणाले की, अनेक कारणांमुळे लोकांना भारतात रस आहे. याचे एक कारण, म्हणजे भारत-चीन नाही. भारताची पुढील काही वर्षे झपाट्याने वाढ होण्याची अपेक्षा आहे. गेल्या दोन दशकांत भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे ५०० अब्ज डॉलरवरून साडेतीन सहस्र अब्ज डॉलर झाले आहे.
भारताकडे गुंतवणूकदारांचे आकर्षण भांडवल प्रवाहात स्पष्टपणे दिसून येते. ‘मॉर्गन स्टॅन्ले’च्या मते वर्ष २०३० पर्यंत भारत जगातील तिसरा सर्वांत मोठा ‘स्टॉक मार्केट’ बनेल.
गुंतवणूक अभ्यासकांचे मत !
भारतात गुंतवणुकीचा पुरस्कार करणार्यांचे म्हणणे आहे की, येथे वाढीची अफाट क्षमता आहे. देशाचे दरडोई उत्पन्न अजूनही अत्यल्प असले, तरी भारताने अनेक वर्षांच्या विस्ताराचा पाया घातला आहे. रुपयाचे जागतिकीकरण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. कोट्यवधी लोकांची ‘जन धन खाती’ उघडण्यात आली आहेत. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांची भारतातील उत्सुकता वाढली आहे. देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकार पुष्कळ पैसा व्यय करत आहे. आगामी निवडणुकीत भाजपला पुन्हा विजय मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे आगामी काळात देशातील सुधारणांना आणखी गती मिळेल.