राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत २० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबईकरांना या वर्षीसुद्धा मालमत्ता कर वाढ न करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. तर धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागण्याचा निर्णय या वेळी झाला. विशेष म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमण्यात येणार आहे. कृषी विद्यापिठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता ६० वर्षे करण्यात आले आहे.
राज्यात २ लाख रोजगार किंवा स्वयंरोजगार निर्माण करणार, गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशूसंवर्धन पद देणार, सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबववून पायाभूत सुविधा बळकट करणार, शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार करणार हे काही महत्त्वाचे निर्णय या वेळी घेण्यात आले.
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील अन्य काही निर्णय
‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’तून ६५ वर्र्षांवरील नागरिकांना लाभ, सेवानिवृत्त न्यायिक अधिकार्यांना सुधारित भत्ते, शेतकर्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान, ‘मधाचे गाव’ योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता, बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसाहाय्य देणार, पतसंस्थांना भक्कम करणार, जुन्नर तालुक्यात बिबटा सफारी, बंजारा आणि लमाण समाजाच्या तांड्यांना मूलभूत सुविधा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय, नांदेडच्या गुरुद्वरासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्धारा अधिनियम लागू करणे, कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चास मान्यता, तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार हे अन्य काही महत्त्वाचे निर्णय या वेळी घेण्यात आले.