सोलापूर येथे ‘युवा चेतना शिबिरा’त स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांविषयी मार्गदर्शन !
सोलापूर – सध्याचा युवावर्गच समाजास पर्यायाने राष्ट्रास जोमाने प्रगतीपथावर नेऊ शकतो, या विश्वासाने १६ ते ३० वर्षे वयोगटातील युवक आणि युवती यांसाठी २६ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत ‘युवा चेतना शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. ‘विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग मॅनेजमेंट’ आणि ‘श्री जिव्हेश्वर विद्यार्थी विकास मंच, सोलापूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन ‘नासा’च्या वैज्ञानिक कु. श्रेया जयकुमार माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी वि.के. वयम् प्रकल्प प्रमुख श्री. सुहास देशपांडे, मंचचे विद्यमान अध्यक्ष श्री. कृष्णा सुरे, संस्थापक अध्यक्ष श्री. काकाश्री लक्ष्मण सरवदे उपस्थित होते. या शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे आणि सौ. राजश्री देशमुख यांनी उपस्थितांना ‘स्वधर्म ते स्वराष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. या शिबिरात ४२ युवक आणि युवती सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी ‘हेगडेवार ब्लड बँके’चे संचालक श्री. शिरीष कुलकर्णी हे अध्यक्षस्थानी होते. आभार प्रदर्शन लक्ष्मी टोणपे यांनी केले. प्रार्थना आणि भारतमातेच्या जयघोषाने कार्यक्रमाचा समारोप झाला. या उपक्रमासाठी शिबिर प्रमुख श्री. शुभम गायकवाड, तसेच विवेकानंद केंद्र आणि मंचचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रत्येकाने स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांचा अभिमान बाळगणे आवश्यक ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
स्वामी विवेकानंद यांनीही विदेशात त्यांच्या भाषणात ‘बंधू-भगिनींनो’ असा आरंभ करून आपल्या विश्वबंधुत्वाची शिकवण देणार्या महान हिंदु धर्माचेच सर्वांना दर्शन घडवले आणि जगात हिंदु धर्म अन् भारत यांचे महत्त्व वाढवले. त्यांनी पोशाखही भारतीय पद्धतीचा केला होता. हाच आदर्श समोर ठेवून आपण कुठेही गेलो, तरी स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे.