देवाने सूक्ष्मातून साधिकेला साधनेसंबंधी केलेले मार्गदर्शन !
‘मी देवाच्या अनुसंधानात असतांना देवाने मला साधनेसाठी पूरक असे विचार सुचवले. त्यामुळे मला साधनेत पुष्कळ साहाय्य झाले. ‘देवाने माझ्यासाठी केलेले हे मार्गदर्शनच आहे’, असे मला वाटते. ‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) या माध्यमातून माझी काळजी घेतली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
१. देवच साधकांना ऊर्जा प्रदान करून त्यांच्याकडून साधना करून घेत असणे
देव त्याच्या गतीनुसार साधकांकडून कृती करून घेत आहे आणि त्यासाठी बळ देत आहे. आम्हा जिवांना देवाच्या गतीने जाणे अशक्य आहे; मात्र देवच सतत साधकांच्या समवेत राहून त्यांना ऊर्जा प्रदान करत आहे आणि त्यांच्याकडून प्रयत्न करून घेत आहे.
२. भांडी घासण्याची सेवा करतांना देवाने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे लक्षात आणून देणे
अ. भांड्यांवर पडलेले डाग किंवा असणारा तेलकटपणा आपल्यातील स्वभावदोषांच्या समान आहे.
आ. भांडी घासणे, म्हणजे मनाची प्रक्रिया (स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न) करण्यासारखे आहे. भांडी घासणे, म्हणजे संघर्षाला सामोरे जाणे आहे.
इ. भांडी घासण्याची घासणी, ही स्वयंसूचनेप्रमाणे आहे, ज्याने स्वभावदोष न्यून व्हायला साहाय्य होते. भांड्यावरील डाग निघत नसल्यास तारेची घासणी वापरावी लागते. त्याचप्रमाणे स्वतःतील तीव्र स्वभावदोष घालवण्यासाठी स्वयंसूचनेसह शिक्षापद्धत अवलंबणे आणि प्रायश्चित्त घेणे इत्यादी कठोर प्रयत्न करणे आवश्यक असते.
ई. केवळ घासणीने घासून भांड्यांवरील डाग निघत नाहीत. घासणीला साबण लावावा लागतो. त्याचप्रमाणे ही सर्व प्रक्रिया करतांना सहसाधक, उत्तरदायी साधक आणि देव यांचे साहाय्य घ्यावे लागते. देवाला शरण जाणे महत्त्वाचे असते.
उ. वरील सर्व प्रक्रिया झाली, तरीही भांडे स्वच्छ होण्यासाठी ते पाण्याने धुवावे लागते; म्हणजे पाण्याविना ते स्वच्छ होऊ शकत नाही, तसेच आपल्या संदर्भात पाणी, म्हणजे ‘देवाची आपल्यावरील कृपा आणि प्रीती’ यांचा वर्षाव आहे. ‘भगवंताच्या कृपेनेच सर्व साध्य होणार आहे’, ही जाणीव अंतरात ठेवून नियमित प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत.
३. देवाची कृपा अखंड अनुभवता येण्यासाठी भक्ती वाढवणे आवश्यक
‘सेवा करतांना सहसाधक साहाय्य करतात. त्या वेळी श्रीकृष्णच त्यांच्या रूपात साहाय्य करतो. गोपींच्या भक्तीमुळे श्रीहरीने अनेक स्थूल रूपे धारण करून प्रत्येक गोपीसह रासलीला केली. त्या वेळी गोपींची श्रीहरीचे स्थूल रूप पहाण्याची क्षमता होती. माझी भक्ती अत्यल्प आहे. माझ्यात श्रीहरीचे तेज पहाण्याची पात्रता आणि क्षमता नसल्याने श्रीकृष्ण प्रेमापोटी अन्य रूपात येऊन मला साहाय्य करतो. हे श्रीकृष्णा, साधकांच्या रूपाने माझ्या साहाय्यासाठी येणारा तूच आहेस. तुला अनुभवण्याची तूच दृष्टी दे. भगवंत अनादी आणि अनंत असल्याने त्याच्या लीलाही अखंड चालू आहेत. माझी भक्ती आणि श्रद्धा ते अनुभवण्यास न्यून पडत आहे’, याची मला जाणीव झाली.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना
देवाने मला त्याच्या दैवी गुरुकुलात सहभागी होण्याची संधी दिली आहे. आम्ही गुरुगृही आहोत आणि साक्षात् श्रीविष्णु गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) रूपाने आम्हाला घडवत आहे. ‘देवाला आम्ही ज्या गतीने घडणे अपेक्षित आहे, तसे प्रयत्न देवा, तूच आमच्याकडून करून घे’, अशी तुझ्या सुकोमल चरणी आर्त भावाने प्रार्थना आहे.’
– वैद्या (कु.) शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२२)
|