तुमची ‘विकृती ’ ही कधीच ‘कलाकृती’ होऊ शकत नाही !

हिंदु धर्म, देवीदेवता यांवर टीका करणारे अन्य धर्मांच्या श्रद्धास्थानांवर बोलण्याचे धाडस दाखवतील का ?

‘मुळात आपण अन्न ग्रहण करतो, मग ते अन्न पचते आणि मल म्हणजेच विष्ठा बाहेर पडते; कारण शरिराची प्रणाली विशिष्ट पद्धतीने काम करत असते. कोणती गोष्ट आत घ्यायची आणि कोणती गोष्ट बाहेर टाकायची, याचे ज्ञान आपल्या शरिराला असते. ‘जे बाहेर टाकले जाते, ते आपण अन्न म्हणून खाऊ शकत नाही’, हा साधा, सरळ, सोपा नियम आहे; मात्र समाजात असे अनेक घटक असतात की, जे हा नियम मोडण्यासाठी प्रयत्न करत असतात; कारण अन्न आणि मल यांतील भेद त्यांना कळत नसतो. अशा लोकांना तुम्ही काय म्हणाल ? विकृत !

श्री. जयेश मेस्त्री

१. केवळ भारतात आणि हिंदु धर्मातच सत्यशोधन करण्याचा अधिकार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ललित कला केंद्राने सादर केलेल्या नाटकाच्या ‘व्हिडिओची क्लिप’ (ध्वनीचित्रफितीचा भाग) सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली. हे नाटक चालू असतांना ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या (अभाविपच्या) विद्यार्थ्यांनी ते थांबवले. या चित्रफितीमध्ये स्पष्ट कळून येते की, त्यांनी प्रभु श्रीराम आणि सीतामातेचा भयंकर अवमान केलेला आहे. आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, भारत हा असा देश आहे आणि हिंदु हा असा धर्म आहे की, जो प्रत्येकाला सत्यशोधन करण्याचा अधिकार देतो, प्रत्येकाला त्याच्या बुद्धीनुसार ईश्वराचा शोध घेण्याची अनुमती देतो, प्रत्येकाला ईश्वर अन् उपासनापद्धत निवडण्याची मोकळीक देतो.

२. हिंदु धर्मामध्ये मोकळीक, तर अन्य पंथांमध्ये मृत्यूदंड !

काही दिवसांपूर्वी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायणावर टीका केली होती. त्यांचे असे म्हणणे होते, ‘‘अनेक रामायण उपलब्ध आहेत. मग खरे रामायण कोणते मानावे ?’’ यावर एका वृत्तवाहिनीने प्रश्न विचारला असता दिग्गज कलाकार अभिराम भडकमकर म्हणाले, ‘‘ही तर अभिमानाची गोष्ट आहे. एकीकडे एकच धर्मग्रंथ मानला जात असतांना आणि त्याला न मानणार्‍याला मृत्यूदंड दिला जात असतांना दुसरीकडे रामायणासारख्या धर्मग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत. ही मोकळीक हिंदूंमध्ये आहे, याचा अभिमान व्यक्त करायला हवा; पण नेमाडेंसारखे मोठे साहित्यिक खेद का व्यक्त करतात, हे मला कळत नाही.’’

जगात असेही धर्म आणि देश आहेत, जिथे ईशनिंदेला मृत्यूदंड दिला जातो. तिथे त्यांच्याकडे साधा प्रश्न विचारायलाही अनुमती नाही. ‘धर्मग्रंथ, ईश्वर यांवर टीका करायची नाही’, असे त्यांचे स्पष्ट मत आहे आणि ‘टीका केली, तर ईश्वराच्याच आदेशानुसार तुमचा अंत केला जाईल’, अशी त्यांची पद्धत आहे. भारतात मात्र तुम्ही प्रश्न विचारू शकता. म्हणूनच दिवंगत सिंधुताई सपकाळही आपल्या भाषणात सहज म्हणून जातात, ‘मला राम आवडत नाही, मला कृष्ण आवडतो’ आणि तरीही आपण त्यांना ‘अनाथांची माय’ म्हणतो. सिंधुताईंकडे पहातांना आपण ‘आई’ म्हणून पहातो. आपण त्यांच्यात सीता शोधण्याचा प्रयत्न करतो. हे आपले वेगळेपण आहे.

३. विकृत नाटकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणणे म्हणजे मानव दानवतेच्या समीप !

भारतात बाबराने पाडलेले श्रीराममंदिर पुन्हा उभारण्यास ५०० वर्षे लागली. भारत स्वतंत्र होऊन ७६ वर्षे उलटून गेली, त्यानंतर हा हक्क त्यांना मिळाला. हिंदू इतके सहनशील आहेत, त्यांच्यात वत्सलता आहे आणि अशा हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हणण्याचा घाट काँग्रेसने घातला होता; मात्र सहनशीलता, वत्सलता या शब्दाचा अर्थ ‘नेभळट’ असा होत नाही. सावित्रीबाई विद्यापिठात जो प्रकार घडला, तो विकृतीचा कळस होता. माता सीतेची वेशभूषा धारण केलेला बाप्या सिगारेट ओढतो आणि आई-बहिणींवरून शिव्या घालतो. ‘ज्या सीतेला हिंदु ‘आई’ म्हणतात आणि ज्या श्रीरामाला हिंदु ‘प्रभु’ म्हणतात, ज्यांची ते दिवसरात्र पूजा करतात’, अशा ईश्वराची अश्लाघ्य कृतीतून टिंगलटवाळी करणार्‍या विकृतीला हिंदूंनी कलाकृती म्हणायचे का ? आणि हा विकृत प्रकार घडू द्यायचा, यालाच जर अभिरुची आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणायचे, तर तुमच्या मानवी भावना मृत झाल्या आहेत आणि तुम्ही मानवतेची मर्यादा ओलांडून दानवतेच्या समीप पोचला आहात.

४. …तर भारतीय राज्यघटना भेद समजून सांगेल !

कला हा सुंदर शब्द आहे. ती सुंदर अभिव्यक्ती आहे. या कलेने अनेकांना निखळ आनंद दिला आहे, कुणाच्या भावनांना स्पर्श करत त्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले आहेत, कुणाला मनसोक्त हसवले आहे, तर कुणाच्या मनावर प्रेमाची फुंकरही मारली आहे. कलेने एकात्मतेची भावना निर्माण केली आहे, स्वातंत्र्याची आवश्यकता आणि त्याचा अर्थ समजावून सांगितला आहे. या कलेचा वापर प्रचारकी हेतूसाठीही करता येईल, तसा अनेकांनी केलाही आहे; मात्र अन्न आणि विष्ठा यांतील भेद तुम्हाला ठाऊक असायला हवा, त्याप्रमाणेच कलाकृती अन् विकृती यांतील भेद तुम्हाला कळायला हवा. नाही तर आमची भारतीय राज्यघटना तुम्हाला या गोष्टीची आठवण करून देण्यास नक्कीच समर्थ आहे.’

– श्री. जयेश शत्रुघ्न मेस्त्री, लेखक, मुंबई