चिलीमध्ये लागलेल्या भीषण आगीत ११२ जणांचा मृत्यू !
|
सँटियागो (चिली) – दक्षिण अमेरिकी देश चिलीच्या जंगलात आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग रहिवासी भागात पसरल्याने आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. आग सर्वप्रथम विना डेल मार आणि वालपरिसो शहरांच्या जंगलात लागली. यामध्ये सहस्रावधी घरे, तसेच अनेक हॉटेल्स जळून खाक झाली आहेत. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार आगीत घर गमावलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, आग पसरल्यामुळे अणूबाँबच्या स्फोटासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सौजन्य फ्रांस 24 इंग्लिश
एकूण परिस्थितीची भयावहता पाहून चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी देशात आणीबाणी घोषित केली आहे. यासह २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही घोषित करण्यात आला आहे. जळणार्या जंगलांमुळे तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोचले असून उष्ण वारे सतत वहात आहेत. यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. आग कधी लागली, याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
घटनेची भयावहता !
१. अनेक जळणारी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीची कोंडी !
२. अनेक गाड्या जळाल्या असून त्यात प्रवास करणार्यांचा मृत्यू !
३. अनेक मृतदेह रस्त्यावर विखुरले आहेत.