पुढील १६ मासांत कर्करोग रुग्णालय उभारणार ! – आरोग्यमंत्री विश्वजित राणे, गोवा (CANCER HOSPITAL In GOA)

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘फेसगो’ आस्थापनाची स्तन कर्करोगावरील लस विनाशुल्क देण्यास प्रारंभ

पणजी,  ४ फेब्रुवारी (वार्ता.) : गोव्यात पुढील १६ मासांत कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केली आहे. जागतिक कर्करोगदिनानिमित्त गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

स्तनाच्या कर्करोगावरील पहिली विनाशुल्क लस डॉक्टरांना सुपुर्द करतांना आरोग्यमंत्री विश्वजित राणे

राणे पुढे म्हणाले, ‘‘यासंबंधी ‘टाटा मेमोरियल’शी पूर्वीच करार करण्यात आला असून त्यांचा सल्ला घेऊन रुग्णालयाची रूपरेषा आखण्यात येत आहे. जागतिक कर्करोगदिनाच्या निमित्ताने ‘फेसगो’ आस्थापनाने सिद्ध केलेली स्तन कर्करोगाची लस रुग्णांना विनाशुल्क देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. एका लसीची किंमत ४ लाख २० सहस्र रुपये असून स्तन कर्करोगावर विनाशुल्क लस देणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे.

राज्यातील एक लाख महिलांची कर्करोगाविषयीची पडताळणी केल्यानंतर त्यांपैकी २ सहस्र ५०० महिलांमध्ये कर्करोगसदृश गाठी आढळल्या आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारकडून कर्करोगावरील लस विनाशुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांची कर्करोगाविषयीची पडताळणी करण्यातही गोवा राज्य अग्रेसर ठरले आहे.’’