अनुपस्थित आरोग्य कर्मचार्यांमुळे महिलेची आरोग्य केंद्रासमोरच प्रसूती !
अंबाजोगाई (जिल्हा बीड) – तालुक्यातील बर्दापूर आरोग्य केंद्रात एक महिला प्रसुतीसाठी आली असता एकही आरोग्य कर्मचारी तेथे उपस्थित नसल्याने या महिलेची आरोग्य केंद्रासमोरच प्रसुती झाली. या घटनेनंतर आरोग्य केंद्रासमोर मोठा जमाव जमला. त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी या प्रकाराची नोंद घेत ‘महिलेवर योग्य ते उपचार करा’, अशा सूचना दिल्या आणि अनुपस्थित कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. केवळ बर्दापूरच नव्हे, तर ग्रामीण भागातील सर्वच आरोग्य केंद्रात सध्या आरोग्य कर्मचारी उपस्थित रहात नाहीत. त्यामुळे ‘वरिष्ठांनी सर्वच आरोग्य केंद्राची पडताळणी करणे आवश्यक आहे’, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. (अशी मागणी स्थानिकांना का करावी लागते ? आरोग्य अधिकार्यांच्या हे लक्षात येत नाही का ? – संपादक)