अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा तकलादू आडोसा…
अनादि काळापासून प्रभु श्रीराम हे या देशाचे आराध्य आहेत. रामायणाला सहस्रो वर्षे झाली, तरी आजही श्रीरामभक्तीत अखंड भारतवर्ष तल्लीन झालेला असतो. नुकताच अयोध्येत झालेल्या प्रभु श्रीरामाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा जगभर ज्या विक्रमी संख्येने पाहिला गेला, ज्यावर लिहिले आणि बोलले गेले, अनेकांच्या मुलाखती झाल्या, अजूनही त्या चलचित्रफिती समाजमाध्यमांवर दिसत आहेत, हे सगळे प्रभु श्रीराम आजही कलियुगात भारतियांच्या मनात किती वसले आहेत, याची साक्ष देतात.
१. ‘ललित कला अकादमी’द्वारे सादर करण्यात आलेले नाटक भावना दुखावणारे !
देशात आता एक नवीन श्रीराम पर्व चालू झालेले असतांना काही समाजघटकांना मात्र हे सहन झालेले दिसत नाही. नुकत्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘ललित कला अकादमी’द्वारे जी ‘रामलीला’ नावाची नाटिका सादर केली गेली, ती हिंदूंच्या मनात चीड आणणारी आणि भावना दुखावणारी होती. नाटिकेत रामायणातील पात्रे व्यासपिठाच्या मागे असभ्य वर्तन करतांना दाखवली गेली. त्यांच्या तोंडी आक्षेपार्ह वाक्ये होती. वर्ष १९८७ मध्ये ‘दूरदर्शन’वर प्रसारित झालेल्या रामायण मालिकेत श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता यांच्या भूमिका करणारे कलावंत आजही कुठेही दिसले, तरी श्रद्धेय हिंदु त्यांना त्यांच्या भूमिकेतील देवत्व मनात ठेवून साष्टांग दंडवत घालतात. सगळ्यांना ठाऊक आहे की, हे कलाकार आहेत, तरीही त्यांना त्यांनी देवाची भूमिका केली; म्हणून मानसन्मान आजही हिंदु समाजाकडून दिला जातो आणि त्या कलाकारांनाही या लोकांच्या प्रेमामुळे सार्वजनिक जीवनात पुष्कळ जपून वागावे लागते.
२. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक भावना दुखावणे कितपत योग्य ?
असे असतांना पुण्यासारख्या सांस्कृतिक वारसा असणार्या शहरात असे रामायणावर विडंबनात्मक नाटक सादर व्हावे आणि ते बघून टाळ्या वाजवणारे निर्लज्ज जन्महिंदू असावेत, यासारखे दुर्दैव नाही. असे नाटक बसवणारे, त्यात काम करणारे, नाटक सादर करू देणारे आणि हे विडंबन पहाणारे यांचा निषेध करावा तितका कमीच आहे. असे काही झाले की, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणारी विरोधकांची प्रणाली जागी होते आणि कला क्षेत्राची कशी मुस्कटदाबी चालू आहे यांवर चर्चा चालू होतात. राज्यघटनेने अनुच्छेद १९(१) द्वारे अभिव्यक्तीस्वातंत्र्य बहाल केले आहे; पण ते अनिर्बंध नसून त्यावर वाजवी निर्बंध आहेत. आपल्याला अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे; म्हणून आपल्या व्यक्त होण्याने समाजाचा एक मोठा गट दुखावून समाजाचे सौहार्दाचे वातावरण बिघडवले जात असेल, तर अशा वेळी अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आडोसा घेता येणार नाही, हे न्यायालयाने वेळोवेळी वेगवेगळ्या निर्णयातून स्पष्ट केलेले आहे.
कलाकारांनी स्वतःच्या कलेचा अविष्कार प्रस्तुत करण्यासाठी मानवी पात्रे आणि मनुष्य जीवनातील अनेक कंगोरे अवश्य दाखवावेत. ‘ओटीटी’ च्या (म्हणजे ओव्हर दी टॉप. ॲपच्या माध्यमांतून चित्रपट, मालिका आधी कार्यक्रम पहाणे) माध्यमातून कलेच्या नावाखाली अशा विषयांमध्ये कुठले टोक गाठले आहे, ते आपण पहातच आहोत; पण हिंदु देवीदेवता, हिंदूंचे सण, हिंदूंच्या परंपरा आणि भावना यांचा व्यंगात्मक किंवा टीकात्मक उपयोग करमणुकीच्या नावाखाली करून बहुसंख्य हिंदूंच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणालाही नाही.
३. धर्माची चौकट न मानण्याचे प्रकार केवळ जन्महिंदूंकडूनच !
इतर धर्मातील अनेक निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक समाजात आहेत; पण त्यांच्या धर्मातील आराध्यांविषयी असे लिखाण किंवा सादरीकरण झालेले कधी पहायला मिळत नाही. कलेच्या नावाखाली असले प्रकार त्यांचे धर्मबांधव सहन करणार नाहीत आणि ते केवळ शाब्दिक निषेध न करता कुठल्या टोकाची प्रतिक्रिया देतील, याची त्यांना चांगली जाणीव आहे. ‘हिंदूंच्या आराध्यांविषयी कुणीही काहीही बोलले तरी चालेल’, असा एक चुकीचा प्रघात पडला आहे. लहानपणापासून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नसल्याने आणि ‘धर्माची चौकट न मानणे, म्हणजे प्रगतीशील असणे’, अशा कल्पना करून दिल्यामुळे असले प्रकार जन्महिंदूंकडूनच होतात. या नाटिकेवर आक्षेप घेणार्या आणि ललित कला अकादमीला जाब विचारून त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार्या ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
– श्री. अनिकेत शेटे, चिंचवड, जिल्हा पुणे (३.२.२०२४)