पहिल्या रांगेतून न्यायमूर्तींना उठवल्याने सर्वच न्यायमूर्ती सहकुटुंब कार्यक्रम सोडून गेले !

वेरूळ – अजिंठा महोत्सवातील घटना !

छत्रपती संभाजीनगर – वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात २ फेब्रुवारीच्या रात्री उद्घाटन कार्यक्रमात खंडपिठातील न्यायमूर्तींना सहकुटुंब आमंत्रित करण्यात आले होते. या न्यायमूर्तींना जागेवरून उठवण्यात आल्याने उपस्थित न्यायमूर्ती सहकुटुंब कार्यक्रम सोडून निघून गेले. महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्यामुळे न्यायमूर्तींना उठवण्यात आल्याची चर्चा आहे.

१. वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला सोनेरी महल येथे प्रारंभ झाला. या महोत्सवाला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठातील वरिष्ठ न्यायमूर्ती सोफ्यावर बसलेले होते.

२. कार्यक्रम चालू असतांना रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास महोत्सवासाठी नेमण्यात आलेले प्रोटोकॉल अधिकारी आणि सुरक्षारक्षक आले. त्यांच्याकडून पहिल्या रांगेतील न्यायमूर्तींना एका गार्डच्या वतीने हात धरून उठून मागील रांगेत जाऊन बसण्यास सांगण्यात आले.

३. हा प्रकार पाहून मागील रांगेत बसलेले अन्य न्यायमूर्ती आणि त्यांचे कुटुंबीय उठून उभे राहिले. या वेळी सर्वच न्यायमूर्तींनी त्यांच्या परिवारासह कार्यक्रम अर्धवट सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला.

४. पर्यटन विकास महामंडळाचे उपसंचालक विजय जाधव आणि मुख्य सल्लागार दिलीप शिंदे यांना समजताच त्यांनी न्यायमूर्ती महोदयांना भेटून क्षमा मागितली.

५. प्रथम न्यायमूर्ती मंगेश पाटील यांना उठवण्यात आले. हे कृत्य पाहून न्यायमूर्ती संतोष चपळगावकर आणि न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी पुढे आले. या वेळी संयोजक आणि न्यायमूर्ती यांच्यामध्ये वादही झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

६. निमंत्रित न्यायमूर्तींमध्ये न्यायमूर्ती मंगेश पाटील, न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, न्यायमूर्ती  निमंत्रित न्यायमूर्तीमध्ये न्यायमूर्ती  मंगेश संदीप मोरे, न्यायमूर्ती  एस्.ए. देशमुख, न्या आर्.एम्. जोशी, न्यायमूर्ती एस्.जी चपळगावकर, न्यायमूर्ती एस्.पी. ब्रहो सहकुटुंब उपस्थित होते.

७. ‘हा प्रकार माध्यमांपर्यंत पोचल्यानंतर संयोजकांनी हा प्रकार अनवधानाने झाला आहे’, असे सांगितले. काही जण असा प्रकार झालाच नसल्याचे सांगत होते.