खारघर येथे ‘अश्वमेध महायज्ञा’च्या हवन कुंडाच्या प्रकटीकरणासाठी विशेष पूजा पार पडली !
नवी मुंबई, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने खारघर सेंट्रल पार्क मैदानामध्ये मुंबई ४७ व्या अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत महायज्ञ होणार आहे. त्यासाठी ४ फेब्रुवारी या दिवशी महायज्ञाच्या हवन कुंडाच्या प्रकटीकरणाची विशेष पूजा करण्यात आली. या वेळी ‘शांतिकुंज हरिद्वार’च्या महान विद्वानांनी सनातन वैदिक पद्धतीनुसार विधी केले. या वेळी ५ जोडप्यांचे पूजन करून आणि वैदिक पद्धतीने महायज्ञासाठी प्रारंभिक कुंड उघडून अश्वमेध महायज्ञासाठी यज्ञशाळेच्या उभारणीचे काम चालू केले. या पूजेच्या वेळी ‘मुंबई अश्वमेध महायज्ञा’चे समन्वयक मनुभाई पटेल, शरद पारधी, परमंद द्विवेदी आदींची प्रमुख उपस्थिती होती. हे अश्वमेध महायज्ञ स्थळ २४० एकरामध्ये आहे.
या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पारधी म्हणाले की,…
१. या महायज्ञात १००८ कुंड असणार असून प्रत्येक कुंडात १० जण मिळून हवन करणार आहेत. अशा प्रकारे एका वेळी १० सहस्रांहून अधिक लोक यज्ञात हवन करणार आहेत. १ सहस्र १०० उपाचार्यांना हवन कुंडाची देखभाल आणि योग्य व्यवस्था करण्यासाठी उच्च स्तरावर प्रशिक्षण दिले जात आहे.
२. २२ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ७ वाजता देवपूजन चालू होईल. ते दुपारी २ वाजेपर्यंत चालेल. हिमालयाच्या छायेत आणि ऋषी विश्वामित्रांचे तपस्थान असलेल्या शुद्ध गंगेच्या कुशीत प्रदीर्घ काळापासून अभ्यास करणारे महान विद्वान हा यज्ञ करणार आहेत.
३. पूज्य डॉ. प्रणव पंड्या ‘अखिल विश्व गायत्री परिवारा’चे नेतृत्व करणार्या पूज्य शैलदीदी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मवादिनी भगिनींच्या आचार्यांचा एक वेगळा संघ असणार आहे.
४. महायज्ञात सर्व जाती-पंथांसाठी प्रवेश विनामूल्य असेल. प्रत्येक व्यक्ती आपल्या भक्तीनुसार या हवनात सहभागी होऊ शकते. महायज्ञादरम्यान ४ सहस्रांहून अधिक जोडपी एकत्र पूजेत सहभागी होणार आहेत.
५. महायज्ञात ‘माता भगवतीदेवी भोजनालय’ या नावाने ४ भोजनालये (महाप्रसाद कक्ष) असणार आहेत. प्रत्येक भोजनालयात प्रतिदिन ८० सहस्रांहून अधिक भाविकांना महाप्रसाद उपलब्ध होणार आहे.
६. संभाजीनगर, श्रीरामपुरम्, मीराबाईनगर, एकनाथनगर, संत ज्ञानेश्वरनगर इत्यादी नावाने एकूण ८ शहरे स्थापन केली जाणार आहेत. येथे विविध प्रांतांतून आलेल्या भाविकांची रहाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
७. मुंबईत विविध दिव्य तीर्थक्षेत्रे आणि हिमालयातील दिव्य तीर्थक्षेत्रांची झलक प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. तसेच सनातन संस्कृतीच्या प्रवर्तकांचे भव्य आणि विहंगम पुतळे पहायला मिळणार आहेत.
८. देवसंस्कृत विद्यापिठाचे प्र-कुलगुरु डॉ. चिन्मय पंड्या यांच्या मार्गदर्शनाखाली याचे बांधकाम चालू आहे. या ठिकाणी सांस्कृतिक कला मंच असणार असून येथे विविध सांस्कृतिक सादरीकरण केले जाणार आहे. ‘विचार मंच’च्या माध्यमातून समाजसेवेत रमलेल्या विविध व्यक्तीमत्त्वांचे विचार जाणून घेतले जाणार आहेत.