पुणे महापालिकेकडून २ दिवसांमध्ये १५० कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध !
पुणे – लोकसभा निवडणूक एप्रिल-मे मासांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्याची आचारसंहिता मार्च मासाच्या मध्यापासून लागण्याची शक्यता आहे. अंदाजपत्रकातील निधी वाया जाऊ नये, यासाठी घाईगडबडीने ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या २ दिवसांमध्ये १५० कोटी रुपयांच्या १३८ निविदा पुणे महानगरपालिका प्रशासनाने प्रसिद्ध केल्या आहेत. महापालिकेच्या विविध विभागांनी या निविदा काढल्या असून, १० लाखांपासून कोट्यवधी रुपयांपर्यंतची विकासकामे यामध्ये प्रस्तावित करण्यात आली आहेत.
महापालिका प्रशासनाकडून अंदाजपत्रकांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे प्रस्तावित केली जातात. या कामांसाठी विभागनिहाय आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाते. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवली जाते. उद्यान, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, पथ, विद्युत विभागांसमवेत सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून लहान-मोठ्या कामांच्या निविदा काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.