भारताने स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित केल्यास जगातील अन्य १५ राष्ट्रे हिंदु राष्ट्र होण्यासाठी सिद्ध !
पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी महाराज यांचा पुनरुच्चार !
मुंबई – भारत हे विश्वाचे हृदय आहे. भारत दिशाहीन झाल्यास त्याचा संपूर्ण विश्वावर वाईट परिणाम होतो. यामुळेच भारताला भारताच्या मूळ रूपात आणणेे आवश्यक आहे. भारताने स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित केल्यास जगातील अन्य १५ राष्ट्रे हिंदु राष्ट्र होण्यासाठी सिद्ध आहेत, असे प्रतिपादन पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी येथे केले. सांताक्रूझ पश्चिम येथील हिरावती बॅन्क्वेट हॉल येथे आयोजित हिंदु राष्ट्र धर्मसभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी उपस्थित जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन केले.
स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. राज्यघटनेतील सूत्रांमध्ये काळानुरूप पालट करावा लागतो. भारतीय राज्यघटना भारताच्या सीमेपुरती लागू आहे; मात्र मनुस्मृतीतील सूत्रे कोणत्याही काळासाठी आणि विश्वात सर्वत्र लागू आहेत. तरीही राज्यघटनेत पालट करण्यास विरोध करणारे शास्त्रात पालट करण्याची भाषा बोलतात.
२. आजचा विकास हा पर्यावरणपूरक नसल्याने त्याला विकास म्हणता येणार नाही. विकासाच्या नावाखाली पर्यावरण नष्ट केले जात आहे.
३. प्रत्येक मनुष्याचे शिक्षण, निवास, सेवा आणि सुरक्षा यांचे रक्षण होईल, अशी व्यवस्था अपेक्षित आहे.
४. विदेशातील अनेक सनातनी जे तत्कालीन परिस्थितीत सनातन धर्मापासून दूर झाले आहेत, ते पुन्हा स्वधर्मात येण्यास इच्छुक आहेत.