पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती
पुणे जिल्ह्यात हिंदु जानजागृती समितीचे विविध उपक्रम होत असतात. त्यात सहभागी झालेल्या काही कार्यकर्त्यांना उपक्रम आणि सेवा करतांना आलेल्या अनुभूती, तसेच कार्याशी जोडलेले धर्मप्रेमी यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. दीपाली कोकाटे, हांडेवाडी, हडपसर, पुणे.
१ अ. स्वप्नात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होणे आणि स्वप्नात ते ‘सर्वांनी दीप प्रज्वलित केलेत कि नाही’, हे पहात असणे : ‘१७.७.२०२३ या दिवशी पहाटे ४ – ५ च्या वेळेत मला एक स्वप्न पडले. त्यात एक ५ – ६ मजली इमारत दिसत होती. त्या इमारतीच्या आगाशीवर पंख पसरलेला गरुड बसलेला होता. तेथेच कठड्यावर हात ठेवून प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आजूबाजूला पहात उभे होते. ती इमारतही आकाशात उंच उडत होती. त्या निर्जीव वस्तूतही भ्रमण करण्याची शक्ती होती. मी गुरुदेवांना विचारले, ‘तुम्ही या इमारतीवरून भ्रमण करत काय पहात आहात ?’ त्या वेळी सर्वत्र अंधार होता; परंतु काही ठिकाणी दीप प्रज्वलित झालेले दिसत होते. तेव्हा गुरुदेवांनी मला सांगितले, ‘सर्वांनी दीप प्रज्वलित केले आहेत कि नाही, ते मी पहात आहे.’
१ आ. स्वप्नात दिसलेल्या दृश्याच्या माध्यमातून त्या दिवशी दीप अमावास्या असल्याचे लक्षात येणे : स्वप्नात दिसलेले ते दृश्य मी विसरूच शकत नाही. असे स्वप्न मला या आधी कधीही पडले नाही. गुरुदेव माझ्या स्वप्नात यावे, इतकी माझी पात्रता नाही. सकाळी उठल्यावर त्या दिवशी दीप अमावास्या असल्याचे माझ्या लक्षात आले.’
(सौ. दीपाली कोकाटे या मागील १ वर्षापासून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी सनातनचा कोणताही आश्रम पाहिलेला नाही. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाचे छायाचित्रही त्यांनी पाहिलेले नाही. त्यांनी प.पू. गुरुदेवांनाही (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाही) कधी पाहिलेले नाही. असे असतांनाही त्यांना आलेली ही अनुभूती म्हणजे गुरुदेवांची कृपा आहे.’ – कु. क्रांती पेटकर, पुणे)
२. श्री. विनीत पाटील, पुणे
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करून एका मासिकाच्या संपादकांना सर्व ग्रंथ दाखवल्यावर त्यांनी ‘हलाल जिहाद’ आणि आयुर्वेद यांविषयी लेख असल्यास देण्यास सांगणे : ‘कोथरुड (पुणे) येथे गुरुपौर्णिमेचा प्रसार करतांना एका मासिकाच्या संपादकांना संपर्क केला. ते मासिक व्यवसायाशी संबंधित होते. ‘त्यांना काय विषय सांगावा ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. त्या वेळी मी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना करून मी त्यांना स्वतःजवळ असलेले सर्व ग्रंथ दाखवले. त्यांनी ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ हातात घेऊन त्याविषयी मला विचारले. ग्रंथाविषयी त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘आम्ही केवळ ऐकले होते; पण सविस्तर माहिती नव्हती. या विषयाचा ३ – ४ पानी लेख लिहून द्या. तो आम्ही प्रसिद्ध करतो. हा विषय पुष्कळ महत्त्वाचा आहे. सर्वांना याविषयी समजले पाहिजे.’’
वरील प्रसंगात मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि ‘प्रार्थना केल्यावर गुरुदेव कसे सुचवतात आणि सेवा करवून घेतात’, याची मला अनुभूती आली. नंतर त्यांनी त्यांचे मासिक मला दाखवले. त्यात आयुर्वेदविषयक लिखाण होते. ते पाहून मी त्यांना माझ्याकडील सनातन संस्थेने प्रकाशित केलेले आयुर्वेदाचे ग्रंथ दाखवले. ते पाहून त्यांनी सांगितले, ‘‘आरोग्यविषयक काही लेख असतील, तर द्या. त्यालाही प्रसिद्धी देऊ.’’
२ आ. रामनाथी (गोवा) येथे पार पडलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तील घडामोडींना चांगली प्रसिद्धी देणार्या एका संपादकांना आभारपत्र द्यायला गेल्यावर त्यांनी अध्यात्मावरील संशोधनाला प्रसिद्धी देण्याविषयी सांगणे : रामनाथी (गोवा) येथे पार पडलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तील घडामोडींना चांगली प्रसिद्धी देणार्या एका संपादकांना आभारपत्र देण्यासाठी श्री. ओजाळेकाका आणि मी गेलो होतो. तेव्हा अनौपचारिक बोलतांना संशोधन कार्याविषयी आम्ही त्यांना सांगितले. ‘अध्यात्मातील माहितीचे वैज्ञानिक भाषेत विश्लेषण कसे सांगितले जाते ? तसेच अध्यात्मातील विविध विषयांवर कसे संशोधन केले जाते ?’, हे आम्ही त्यांना सांगितले. ते ऐकून त्यांना पुष्कळ आनंद झाला. सर्व ऐकल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही मला संशोधन कार्याचे लेख मिळवून देऊ शकता का ? मी संशोधनाच्या या कार्याला प्रसिद्धी देतो. याची समाजाला अधिक आवश्यकता आहे.’’ त्यांचे सर्व बोलणे ऐकल्यावर गुरुदेवांविषयी मला कृतज्ञता वाटली. ‘गुरुदेव कशी सेवा करवून घेतात ?’, हे अनुभवायला मिळाले.
२ इ. ‘एका कार्यक्रमाच्या निमित्ताने काढलेल्या दिंडीनंतर सेवा सहजतेने होत आहे’, असे अनुभवायला येणे : पूर्वी सेवेत पुष्कळ प्रयत्न करायला लागायचे; मात्र ‘एका कार्यक्रमाच्या वेळी काढलेल्या दिंडीनंतर सेवा सहजतेने होत आहे’, असे अनुभवायला येत आहे. अनेक उपक्रमांना स्थानिक स्तरावर चांगली प्रसिद्धी मिळत आहे. बरेच स्थानिक ‘न्यूज चॅनल’, ‘ऑनलाईन पोर्टल’ यांवर समितीच्या उपक्रमांना चांगली प्रसिद्धी मिळत आहे. अशा काही अनुभूती गुरुदेवांच्या कृपेने सेवा करतांना अनुभवता येत आहेत. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
३. श्री. श्रीकांत बोराटे, भोर, शिरवळ, पुणे.
३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानंतर प्रसारात प्रत्येक ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळणे आणि समितीच्या कार्याविषयी विश्वास वाढणे : ‘प्रसार करतांना पूर्वी ज्यांना राष्ट्र आणि धर्म या विषयांची आवड आहे, अशा व्यक्ती किंवा जिज्ञासूच धर्मशिक्षण, धर्मरक्षण, तसेच हिंदु राष्ट्र यांविषयी प्रतिसाद द्यायचे; परंतु गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) ब्रह्मोत्सव सोहळा झाल्यापासून प्रत्येक ठिकाणी, तसेच प्रत्येक जण सध्या राष्ट्र आणि धर्म या विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. प्रत्येकाच्या मनात ‘हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, असा विचार येत असल्याचे लक्षात येत आहे; परंतु ‘हिंदु राष्ट्राचे नेतृत्व कोण करणार ?’, असेही लोकांच्या मनात आहे.
पूर्वी अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते म्हणायचे, ‘‘आक्रमकपणे कार्य केले, तरच हिंदु राष्ट्र येणार आहे’’; परंतु आता तेही हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य सनदशीर मार्गाने असल्याचे बोलून दाखवत आहेत. तसेच ‘सनदशीर मार्गाने कसे कार्य करू शकतो ?’, याविषयी ते विचारू लागले आहेत. त्यानुसार ते कृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरून समाजात हिंदुत्वनिष्ठ लोकांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयीही विश्वास निर्माण झाल्याचे जाणवत आहे.
३ आ. प्रसारसेवेला दुचाकीवरून जातांना साधनेच्या स्तरावर केलेल्या प्रयत्नांमुळे झालेला लाभ : मला सेवेसाठी ग्रामीण भागातील गावांमध्ये धर्मशिक्षणवर्ग घेण्यासाठी रात्री जावे लागते. त्या वेळी गुरुकृपेने प्रवास चालू करण्याच्या आधी ‘वाहनाभोवती संरक्षककवच निर्माण व्हावे’, यासाठी वाहनदेवतेच्या चरणी प्रार्थना होते. मी वाहन चालवतांना माझ्याकडून ‘मी वाहन नाही, तर धर्मरथ चालवत आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न होतो, तसेच ‘माझ्या मागे परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) बसले आहेत आणि धर्मरथावर मारुतिराया विराजमान आहे अन् धर्मरथाच्या सर्व बाजूंनी श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र फिरत आहे’, असा भाव ठेवून दुचाकी वाहन चालवण्याचा प्रयत्न होतो. यांमुळे प्रसारात कुठेही, कधीही जातांना ‘गुरुदेव आणि मारुतिराया सोबत आहेत अन् ते संरक्षण करत आहेत’, अशी श्रद्धा निर्माण होते. तेव्हा शरीर पूर्ण हलके रहाते. ‘वाहन मी चालवत नसून कोणतीतरी शक्तीच माझ्याकडून चालवून घेत आहे’, असे मला जाणवते. पूर्ण प्रवासात माझ्या समवेत एक पांढरा प्रकाश जाणवतो. त्या वेळी मनाला पुष्कळ आनंद मिळतो आणि प्रवास गुरुकृपेने सुखरूप अन् निर्विघ्नपणे पार पडतो. घरी आल्यावर वाहनदेवता आणि गुरुदेव यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.
३ इ. प्रतिदिन प्रसारसेवेला दुचाकीवर जातांना होत असलेली प्रार्थना : ‘हे श्रीकृष्णा, प्रभु श्रीरामचंद्रा, श्रीविष्णुस्वरूप परम पूज्य गुरुमाऊली, भूमीदेवते, वायुदेवते, वरुणदेवते, महर्षि, सप्तर्षि, ब्रह्मादी देवतांनो या धर्मरथाभोवती, माझे मन, बुद्धी आणि देह यांच्याभोवती तुमच्या सुदर्शनचक्राचे अन् नामजपाचे अभेद्य असे संरक्षणकवच क्षणोक्षणी असू दे. स्थुलातून आणि सूक्ष्मातून होणार्या आक्रमणांपासून धर्मरथाचे आणि माझे संरक्षण होऊ दे. मला जेथे सेवेला जायचे आहे, त्या स्थळी तुझ्या नामस्मरणात राहून, अनुसंधानात राहून सुखरूपपणे आणि निर्विघ्नपणे पोचता येऊ दे. या मोक्षमार्गातील प्रवासातून आणि सेवेच्या माध्यमातून मिळणारे अखंड ईश्वराचे चैतन्य, ज्ञान, विचार, आनंद अन् तत्त्व ग्रहण करता येऊ दे. त्याचा आध्यात्मिक आणि साधनेच्या वृद्धीसाठी अन् हिंदु राष्ट्र संस्थापनेच्या कार्यासाठी लाभ करून घेता येऊ दे, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
(सर्व लिखाणांचा दिनांक २१.७.२०२३)