श्रुति हेच सनातन हिंदु धर्म आणि संस्कृतीची महनीयता असून तिलाच शरण जायला हवे !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे मौलिक विचारधन !
‘जीव, जगत, जगदीश्वर आणि त्यांचा परस्पर संबंध यांचे ज्ञान मानवी बुद्धीला अशक्य आहे. देव, आत्मा, ब्रह्म, त्यांचे संबंध, मृत्यूनंतरचा जीवात्म्याचा प्रवास, स्वर्ग, नरक, विश्वाचे मूळ, धर्म आणि अधर्म यांपासून उद्भवणारे पुण्य आणि पाप, त्या कर्मफळाची परिपक्वता, ती कर्मफळे, कोणत्या कर्माचे कोणते फळ, मानवाची अंतिम नियती, ती परिपूर्ती, हे ज्ञान मानवाला त्याची इंद्रिये वा बुद्धी देऊ शकत नाहीत. प्रत्यक्ष आणि अनुमान ही प्रमाणे येथे पांगळी आहेत. Reason can never answer these questions (कारण या प्रश्नांची उत्तरे कधीच देऊ शकत नाही) आणि हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्याविना मानवी जीवनाला उद्दिष्ट असणार नाही. जीवन भरकटेल. कशाकरता जगायचे ? What is life after all ? (आयुष्य म्हणजे काय ?) नीती, नैतिक आचरण, दैवी संपदा, श्रेष्ठ आणि उत्तम, असे जे मानवी स्वभावातच आहे, त्यांचे वळण या प्रश्नांच्या उत्तरावर अवलंबून राहील; म्हणून या प्रश्नांची उत्तरे शोधलीच पाहिजेत. श्रुतिस्मृति पुराणादि शास्त्रांच्या डोळ्यांनी पाहिले की, सगळ्या समस्या अलगद उलगडलेल्या दिसतात. श्रुति super sensuous (संवेदनाक्षम) ज्ञान देतात. श्रुति हेच शब्द प्रमाण आहे. श्रुति हेच सनातन हिंदु धर्म आणि संस्कृतीची विशेषता अन् महनीयता आहे. त्याकरता श्रुतिलाच शरण जायला हवे.’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’ ऑक्टोबर २०२३)