खांदेश्वर येथे ‘क्रेडाई बी.ए.एन्.एम्. रायगड बिल्डर वेल्फेअर असोसिएशन’च्या वतीने भव्य मालमत्ता प्रदर्शनास प्रारंभ !
नवी मुंबई – क्रेडाई बी.ए.एन्.एम्. रायगड बिल्डर वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने ७ व्या भव्य मालमत्ता (प्रॉपर्टी एक्झिबिशन) प्रदर्शनाचे आयोजन २ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत खांदेश्वर रेल्वेस्थानक, कामोठे येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी क्रेडाई रायगडचे अध्यक्ष अश्विन पटेल, सचिव मनसुख पटेल, वसंत भद्रा, विघ्नेश पटेल आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
या वेळी गणेश देशमुख म्हणाले की, मालमत्ता प्रदर्शनात एकाच छताखाली उरण, नवी मुंबई, पनवेल ते थेट खोपोलीपर्यंतचे प्रकल्प पहाता येणार आहेत. अशा प्रदर्शनातून आपले शहर भविष्यात कसे दिसेल ? हे येथे नागरिकांना पहाण्यास मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू सागरी महामार्ग, मेट्रो आदी दळणवळणाची उपलब्धता लक्षात घेऊन विकासकांनी त्यांचे प्रकल्प या प्रदर्शनात ठेवले आहेत. प्रशासनाचे काम विकासाभिमुख असून विकासकांच्या अडचणी वेळेत सोडवल्या जातात. ‘युडीसीपीआर्’मध्ये विकासकांच्या सर्व समस्या सुटणार आहेत. या प्रदर्शनात १५ लाख ते ३ कोटींपर्यंतची घरे, तसेच व्यावसायिक कार्यालय गाळे उपलब्ध आहेत. नवी मुंबई, रायगड परिसरात घरांची मागणी वाढली आहे. त्यात वाढते अन्य दर पहाता भविष्यात किमतीत वाढ होऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्यांनी ‘आता नाही, तर कधीच नाही, असा निश्चय करत घर घेतले, तर स्वस्तात मिळू शकते’, असे क्रेडाई रायगडचे अध्यक्ष अश्विन पटेल यांनी सांगितले.
सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !
नवी मुंबई – ‘क्रेडाई बी.ए.एन्.एम्. रायगड बिल्डर वेल्फेअर असोसिएशन’ यांच्या वतीने ७ व्या भव्य मालमत्ता (प्रॉपर्टी एक्झिबिशन) प्रदर्शनामध्ये सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सकाळी १० ते रात्री ८.३० पर्यंत हे ग्रंथप्रदर्शन चालू असणार आहे.
या ग्रंथप्रदर्शनाला बांधकाम आणि विविध क्षेत्रांतील व्यवसायिक यांच्यासह जिज्ञासूंनी भेट दिली. तसेच सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळाविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेतली. दैनंदिन जीवनात धर्माचरण आणि साधना यांसाठी करावयाचे प्रयत्न यांची माहिती जिज्ञासूंनी समजून घेतली. तसेच अनेकांनी साधना, वास्तूशुद्धी आदी विषयांवर शंकानिरसन करून घेतले.
सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती स्मिता नवलकर यांनी ‘क्रेडाई बी.ए.एन्.एम्.’ रायगड बिल्डरच्या सभासदांना धर्मशास्त्रानुसार उद्घाटन कसे करावे, याविषयीची माहिती दिली होती. त्यानुसार मान्यवरांच्या हस्ते कयपंजीने दीपप्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.