गोवा : श्रीरामाविषयी वादग्रस्त ‘पोस्ट’ प्रसारित केल्याची प्रकरणे
|
डिचोली, २ फेब्रुवारी (वार्ता.) : लामगाव पाठोपाठ पिळगाव येथे रहाणार्या एका धर्मांध मुसलमान युवकाने अयोध्येतील श्री रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेशी संबंधित आक्षेपार्ह ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमातून प्रसारित केली आहे. यासंबंधी डिचोली पोलिसांनी संबंधित धर्मांध मुसलमान युवकाला कह्यात घेतले आहे. केरी, वाळपई येथे सामाजिक माध्यमातून श्रीरामाविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी ५०० हून अधिक रामभक्तांनी केरी पोलीस चौकीला भेट देऊन संबंधित धर्मांध अल्पवयीन मुसलमान युवकावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी मुसलमान समाजाने गावात एक बैठक घेऊन संबंधित धर्मांध युवकाला गाव सोडून जाण्याचे निर्देश दिले आहेत. डिचोली येथील श्रीरामभक्तांनी २ फेब्रुवारी या दिवशी श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापनाला निवेदन सादर करून संबंधित संशयित धर्मांध विद्यार्थ्याला विद्यालयातून त्वरित काढून टाकण्याची मागणी केली आहे.
डिचोली येथील श्रीरामभक्त सर्वश्री भगवान हरमलकर, अभिजीत तेली, दिनेश मयेकर, तेजस काणेकर आदींनी २ फेब्रुवारी या दिवशी श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जोस मिनेझिस आणि विद्यालयाचे व्यवस्थापक विजय सरदेसाई यांची भेट घेऊन नवीन वाडा, सातेरीनगर, पिळगाव येथील रहिवासी असलेल्या आणि पोलिसांच्या कह्यात असलेल्या धर्मांध मुसलमान विद्यार्थ्याला विद्यालयातून काढून टाकण्याची मागणी केली. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही १ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यातून एका श्रीरामभक्ताने संपर्क करून घटना आणि त्या अनुषंगाने ग्रामस्थांची मागणी याविषयी माहिती दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन्ही संशयितांवर योग्य ती कारवाई करण्याबरोबरच संशयितांना गावातून तडीपार करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला होता.
धर्मांध युवकाला केरी, वाळपई गाव सोडून जाण्याचा मुसलमान संघटनेचा निर्देश
२ दिवसांपूर्वी केरी, वाळपई येथील एका धर्मांध मुसलमान युवकाने प्रभु श्रीरामाविषयी सामाजिक माध्यमातून आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केली होती आणि यामुळे केरी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी मुसलमान समाजाच्या साहाय्याने संबंधित धर्मांध युवकाला कह्यात घेऊन त्याला रामभक्तांसमोर उभे करून क्षमा मागण्यास भाग पाडले होते. या वेळी मुसलमान समाजाच्या प्रतिनिधींनी ‘संबंधित धर्मांध युवकाचे पुढे काय करायचे ? याविषयी बैठक घेऊन ठरवतो’, असे सांगितल्यावर श्रीरामभक्त माघारी फिरले होते. त्यानंतर गावात मुसलमान समाजाच्या प्रतिनिधींनी बैठक घेऊन संबंधित युवकाला गाव सोडून जाण्याचे निर्देश देण्याचा निर्णय घेतला.