कल्याणचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेनेच्या शहरप्रमुखावर गोळीबार !

पोलीस ठाण्यात घडला प्रकार !

भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड

कल्याण : येथील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे समर्थक राहुल पाटील यांच्यावर २ फेब्रुवारीच्या रात्री गोळ्या झाडल्या. उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल जगताप त्यांच्या कक्षाबाहेर गेले असता त्यांच्या कक्षात हा प्रकार झाला.

१. या कृत्याचा जराही पश्‍चात्ताप नसलेले गणपत गायकवाड म्हणाले, ‘‘माझ्या मुलाच्या अंगावर महेश गायकवाड धावून आले. त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ५०० मुले जमा केली होती. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही. जर माझ्यासमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील, तर माझा जगून तरी काय फायदा ? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला.’’

(सौजन्य : Zee 24 Taas)

२. महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे घायाळ झाले असून त्यांना सकाळी ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आले. गायकवाड यांना ५ गोळ्या लागल्या आहेत. पुढील उपचारांसाठी संध्याकाळी त्यांना उल्हासनगर रुग्णालयात नेण्यात आले. गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या शरीरातून सर्व गोळ्या काढल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. पाटील यांची प्रकृती स्थिर आहे.

३. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. कल्याणमध्ये तणावाचे वातावरण असून पूर्वेतील तीसगाव नाका येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

४. गेल्या वर्षभरापासून दोन्ही गायकवाड गटात कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीवरून पुष्कळ स्पर्धा चालू होती.

५. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, माझ्यावर होणारा अन्याय मी पक्षश्रेष्ठींना सांगूनही त्यांनी नोंद घेतली नाही. कल्याण पूर्वेत शिंदे बापलेक माझ्यावर अन्याय करत राहिले. माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. मी केलेल्या कामांचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे घेत होते.

६. ‘महेश गायकवाड यांनी कुंपण तोडून माझी भूमी कह्यात घेतली. मी त्यांना न्यायालयाकडून ऑर्डर आणण्यास सांगितले; पण त्यांनी दादागिरी चालूच ठेवली’, असे भाजपचे गणपत गायकवाड यांनी सांगितले.

७. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा ?’ अशी पोस्ट ‘एक्स’वर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून यात बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस : कायद्यासमोर सगळे समान आहेत. पोलीस ठाण्यात गोळीबार का झाला ? या प्रकरणात पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. यातून लवकरच सत्य समोर येईल.