भाषा, संस्कृती आणि राष्ट्रीयता !
१. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने भारतीय संस्कृती समूळ नष्ट करण्यासाठी सर्व योजना राबवणे
‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये राष्ट्रवादाच्या आधारावरच विजय प्राप्त झाला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदू होती. सत्तेवर आल्यावर काँग्रेस आपल्या सिद्धांत मूल्यांपासून दूर होत गेली. देशाच्या आतापर्यंतच्या काँग्रेस सरकारने तिच्या सर्व योजना भारतीय संस्कृती समूळ नष्ट करण्यासाठी बनवल्या होत्या. ‘सांप्रदायिक आणि लक्षित हिंसा विधेयक’ पारित करण्याची पराकाष्ठा केली होती; परंतु ते विधेयक संसदेत पारित होऊ शकले नाही. ‘संस्कृत’ ही भारताची विवेकशील वाणी, भारतीय संस्कृतीची वाहक आणि संगणकासाठी सर्वोत्तम अशी भाषा आहे. असे असतांना केंद्रीय शिक्षण मंडळ, उच्च शिक्षण आणि सर्व राज्ये यांमध्ये संस्कृत भाषेची बुद्धीपुरस्सर घोर उपेक्षा केली. कोट्यवधी रुपये व्यय करून अरबी-फारसी भाषेची मोठमोठी अध्ययन केंद्रे उघडण्यात आली. राज्यघटनेची समानता आणि धर्मनिरपेक्षता यांच्या तत्त्वाविरुद्ध नगर, गावे अन् खेडोपाडी फुटीरतावादी अन् धार्मिक कट्टरतावाद शिकवण्यासाठी मदरसे काढले. काँग्रेस सरकारने जाता जाता राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनात आयोजकाची भूमिका निभावणार्या आणि जनतेची भाषा असलेल्या हिंदीला भारतापासून कायमस्वरूपी दूर केले. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पहिल्या इयत्तेपासून इंंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याची योजना राबवली.
२. विकसित देशांनी स्वतःच्या मातृभाषेला, तर भारतात इंग्रजीला महत्त्व देणे
इस्रायल, रशिया, जपान, चीन, जर्मनी यांसारखे वैज्ञानिकदृष्ट्या विकसित देश प्रशासकीय आणि वैज्ञानिक कार्य हे त्यांच्या मातृभाषेतून करत आहेत; परंतु भारताच्या अबाल-वृद्ध सुशिक्षित वर्गाच्या डोक्यात विषारी विचार रुजला आहे, ‘भारताचे कार्य इंग्रजीविना चालूच शकत नाही आणि इंग्रजीला महत्त्व दिले नाही, तर भारत भौतिक विकासात नक्कीच मागे पडेल.’ प्रत्यक्षात हाच घातक विचार आमच्या संस्कृतीच्या र्हासाचे प्रमुख कारण आहे. भारतात इंग्रज येण्यापूर्वी संपूर्ण जगातील सभ्य आणि सुशिक्षित लोक संस्कृत भाषा शिकत होते; कारण त्यांना भारतातून गणित, ज्योतिष, खगोल, भौतिक, रसायनशास्त्र, आयुर्वेद, अर्थशास्त्र, न्यायशास्त्र, राजनीतीशास्त्र, दर्शन आणि अध्यात्म शिकण्याची महत्त्वाकांक्षा होती. आजसुद्धा संपूर्ण जगभरात विशेषतः पौर्वात्य देशांवर भारतीय भाषा आणि संस्कृती यांचा पगडा असल्याचे लक्षात येते.
३. भारतात संस्कृत भाषेतून शिक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !
लोकांच्या मनमस्तिष्कातून इंग्रजीचे भूत बाहेर काढण्यासाठी संपूर्ण देशात संस्कृत भाषेतून शिक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे कार्य ‘इंडिया’ला ‘भारत’ बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
४. प्रार्थना
आज देशात फैलावलेला भ्रष्टाचार, आतंकवाद, व्यभिचार, महिलांवरील अत्याचाराच्या घटना स्पष्टपणे आमच्या सार्वभौमिक भारतीय संस्कृतीच्या र्हासाचे परिणाम आहेत. जेथे महानगरांमध्ये तथाकथित शिक्षित लोकांचे अधिक प्रमाण आहे, तेथेच गावापेक्षा अधिक व्यभिचार, भ्रष्टाचाराच्या घटना घडतात; कारण ग्रामीण भाग अजूनही पूर्णतः इंंग्रजी विकृतीच्या (पाश्चात्यीकरणाच्या) विळख्यात सापडलेला नाही. भारतमाता ही ग्रामवासिनी आहे. ‘संपूर्ण देशात इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालू करून भारतमातेला गावागावातून निर्वासित करण्याचा उपक्रम राबवू नये’, अशी राजकीय नेत्यांना कळकळीची प्रार्थना आहे.’
(साभार : मासिक ‘गीता प्रवाह’, मार्च २०२१)