कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांचे सोलापूर येथे विविध कार्यक्रम !
सोलापूर – कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांचे १ फेब्रुवारीला सोलापूर येथे आगमन झाले असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे कर्णिक नगरजवळील पद्म नगरातील म्याकल कुटुंबियांकडे वास्तव्याला आहेत. गेल्या २ वर्षांपासून जगद्गुरु धर्मप्रचार यात्रेवर आहेत. स्वागताध्यक्ष मोहन दाते आणि जनार्दन कारमपुरी विविध कार्यक्रमांचे नियोजन करत आहेत. जयंत श्रीगांधी, व्यंकटेश चिलका, योगेश म्याकल यांचाही त्यात सहभाग आहे.
या संदर्भात श्री. योगेश म्याकल म्हणाले, ‘‘रामांजली निवासस्थानी जगद्गुरु शंकराचार्यांचा मुक्काम असून प्रतिदिन भाविकांनी दर्शन, पूजापाठ यांसाठी उपस्थित रहावे. प्रतिदिन ५० सहस्रांहून अधिक भाविक दर्शन घेतील असा अंदाज आहे. ३ फेब्रुवारीला सकाळी ७ ते ८ दर्शन, ९ वाजता चंद्रमौलश्वर पूजा, सायंकाळी ७ वाजता व्यंकटेश भवन, बालाजी मंदिराजवळ, दाजी पेठ येथे दर्शन आणि प्रवचन होणार आहे. ४ फेब्रुवारीला दुपारी जगद्गुरु पुण्याकडे प्रस्थान करतील.’’