उच्चशिक्षण संस्थांना ‘वन नेशन वन डेटा प्लॅटफॉर्म’ लागू करण्याचा निर्णय !
देशभरातील उच्चशिक्षण संस्थांच्या मूल्यांकन पद्धतीमध्ये महत्त्वाचे पालट !
पुणे – राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) देशभरातील उच्चशिक्षण संस्थांच्या मूल्यांकन पद्धतीमध्ये महत्त्वाचे पालट करण्यात आले आहेत. आता उच्चशिक्षण संस्थांना मूल्यांकनाची श्रेणी पद्धत हद्दपार करून शिक्षणसंस्थांनी माहिती सादर करण्यासाठी ‘वन नेशन वन डेटा प्लॅटफॉर्म’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता नॅक मूल्यांकनात बायनरी पद्धतीचा वापर करण्यात येईल, अशी माहिती नॅकने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’च्या अनुषंगाने नॅक, एन्.बी.ए., एन्.आय.आर्.एफ्. अशा मूल्यांकन संस्थांच्या प्रक्रियेत पालट प्रस्तावित होते. त्यासाठी नियुक्त केलेल्या ‘डॉ. राधाकृष्णन् समिती’चा अहवाल केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी १६ जानेवारीला स्वीकारला. २७ जानेवारीला ‘नॅक’च्या बैठकीत ही प्रक्रिया कार्यवाहीच्या दृष्टीने चर्चा करून नवी पद्धत पुढील ४ मासात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही पद्धत डिसेंबर २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे.