धर्मप्रवर्तक राष्ट्रसंत स्वामी विवेकानंद यांनी केलेले ऐतिहासिक कार्य आणि त्यांची अद्वितीय वैशिष्ट्ये !
आज स्वामी विवेकानंद यांची तिथीनुसार जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
युवकांच्या समोर आदर्श निर्माण करणारे धर्मप्रवर्तक राष्ट्रसंत स्वामी विवेकानंद यांनी केलेले कार्य आणि विचार यांविषयीची अधिक माहिती येथे देत आहोत.
१. स्वामी विवेकानंद यांचे ऐतिहासिक कार्य
२५ वर्षांच्या वयातच नरेंद्रनाथ दत्त, म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी भगवी वस्त्रे धारण केली होती. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताची यात्रा पायीच केली. युरोप-अमेरिकेतील लोक त्या वेळी भारतवासियांना अत्यंत हीन दृष्टीने पहात होते. तेथील लोकांनी पुष्कळ प्रयत्न केला की, स्वामी विवेकानंद यांना सर्वधर्म परिषदेत बोलण्यासाठी वेळच मिळू नये; परंतु त्यांना बोलण्यासाठी थोडा वेळ मिळाला. त्या परिषदेत त्यांचे विचार ऐकून सर्व विद्वान आश्चर्यचकित झाले. शिकागोमध्ये झालेल्या सर्वधर्म परिषदेनंतर स्वामी विवेकानंद यांचे धर्मप्रसाराचे कार्य अत्यंत गतीने वाढले. धर्मपरिषदेच्या नंतर स्वामीजींची वेगवेगळ्या देशांत ठिकठिकाणी प्रवचने झाली. खरी धर्मपिपासा असणार्या अमेरिकन शिष्यांचा एक समूह बनवण्याच्या इच्छेने स्वामीजींनी प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क वर्ग आरंभ केला. डिसेंबर १८९६ पर्यंत स्वामीजी विदेशात राहिले. तेथे ते अतीउत्कट कार्यात व्यस्त राहिले. न्यूयॉर्कमध्ये त्यांची अनेक व्याख्याने झाली आणि त्यांनी तेथे अनेक वर्ग घेतले. याच काळात त्यांनी ‘राजयोग’ ग्रंथाची रचना केली. त्यांनी इंग्लंडची २ वेळा यशस्वी यात्रा केली. तेथे त्यांनी जी प्रवचने दिली, त्याचा संग्रह ‘ज्ञानयोग’ नावाच्या ग्रंथरूपाने प्रसिद्ध आहे. इंग्लंडमध्ये त्यांचे जे शिष्य झाले त्यांच्यापैकी ‘भगिनी निवेदिता’ यांचे नाव उल्लेखनीय आहे. त्यानंतर अमेरिकेत त्यांचे अत्यंत जोरात स्वागत झाले. तेथे त्यांच्या भक्तांचा एक मोठा समुदाय निर्माण झाला. ते अमेरिकेत ३ वर्षे राहिले आणि तेथील लोकांना त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाची अद्भुत ज्योत प्रदान केली. त्यांची वक्तृत्वशैली आणि ज्ञान पाहून तेथील प्रसारमाध्यमांनी त्यांना ‘सायक्लॉनिक हिंदु’ म्हणजे ‘वादळी हिंदु’ ही उपाधी दिली. ‘अध्यात्म-विद्या आणि भारतीय दर्शन यांविना जग अनाथ होऊन जाईल’, असा स्वामी विवेकानंद यांचा दृढ विश्वास होता. अमेरिकेमध्ये त्यांनी ‘रामकृष्ण मिशन’च्या अनेक शाखा स्थापन केल्या. अनेक अमेरिकन विद्वानांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. ते नेहमी स्वतःला ‘निर्धनांचा सेवक’ म्हणत होते. त्यांनी सदैव भारताचा गौरव देशादेशांमध्ये उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला.
२. स्वामी विवेकानंद यांची इतर वैशिष्ट्ये
स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रातून त्यांचा हिंदु धर्माभिमान, राष्ट्रप्रेम, त्यांची लोकसंग्राहक वृत्ती अशी विविध वैशिष्ट्ये सुस्पष्ट होतात. स्वामीजींची आणखी काही वैशिष्ट्ये असून ती पुढीलप्रमाणे –
२ अ. वैयक्तिक साधनेप्रती दक्षता : स्वामीजींचे कार्य अविश्रांत चालू होते. अविश्रांत चालणार्या कार्यातही स्वामीजींनी स्वतःची साधना, म्हणजेच ध्यान, जप-जाप्य, सद्गुरूंची पूजा इत्यादींकडे कधी दुर्लक्ष केले नाही. ‘वैयक्तिक साधना केल्यावरच राष्ट्रकार्य यशस्वी होणार’, अशी त्यांची अतूट श्रद्धा होती.
२ आ. उत्तम शिष्य : स्वामी विवेकानंद जोपर्यंत नरेंद्र होते, तेव्हा ते पुष्कळ तर्क करणारे आणि नास्तिक होते. रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना एकदा म्हटलेही होते, ‘कुठवर बुद्धीमान होऊन रहाणार ? या बुद्धीला सोडून दे. समर्पणभावात ये, तरच सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो, नाही तर नाही. तर्क करून सत्य जाणता येऊच शकत नाही. विवेक जागृत कर.’ स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण परमहंस यांचे बोलणे समजले. त्यानंतर त्यांनी कधीच स्वतःची बुद्धी चालवली नाही. रामकृष्ण परमहंस यांचीच बुद्धी चालली (गुरूंचे ऐकणे).
२ इ. जिज्ञासू : संगीत, साहित्य आणि दर्शन यांमध्ये स्वामीजींना विशेष रूची होती. पोहणे, घोडेस्वारी आणि कुस्ती यांची त्यांना विशेष आवड होती. स्वामीजींनी २५ वर्षांच्या वयातच वेद, पुराण, बायबल, कुराण, धम्मपद, तनख, गुरुग्रंथ साहिब या धार्मिक ग्रंथांचे वाचन केले होते. याचसमवेत दास कॅपिटल, अर्थशास्त्र, राजनीती शास्त्र, साहित्य, संगीत आणि दर्शन यांसह अन्य ग्रंथांचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता.
२ ई. श्रेष्ठ संघटक : स्वामीजींनी ‘रामकृष्ण संघ’ (रामकृष्ण मिशन) नावाची संघटना स्थापन केली. त्याद्वारे त्यांनी लोकसेवा करण्याच्या हेतूने अनेक नि:स्वार्थ युवकांना प्रेरित आणि प्रशिक्षित केले. या संघटनेचे कार्य जगभरात पसरले.
२ उ. श्रेष्ठ विचारवंत : स्वामीजी आधुनिक भारताचे ‘श्रेष्ठ हिंदु धर्मवादी विचारवंत’ आहेत. स्वामीजींनी सनातन धर्माच्या ऋषिमुनींच्या विचारांना पुनर्जागृत करतांना प्राचीन इतिहासाची पुष्कळ प्रशंसा केली आणि हिंदु समाजात एक नवचेतना उत्पन्न केली. लोकमान्य टिळक यांनी स्वामीजींचे कार्य पाहून त्यांना ‘विसाव्या शतकातील शंकराचार्य’ या संज्ञेने संबोधित केले. स्वामीजींच्या कार्यामुळे हिंदु धर्मावर आलेल्या तत्कालीन आघातांवर अंकुश लागला. त्यांचे विचार आजही हिंदु समाजासाठी प्रेरणादायी आणि बोधप्रद आहेत.
३. स्वामी विवेकानंद यांचे प्रसारकार्य
स्वामी विवेकानंद यांच्यावर ‘वेदांत दर्शन’ आणि ‘गीतेचा कर्मवाद’ यांचा खोलवर प्रभाव होता. त्यांचे दर्शनाचे मूळ वेदांत आणि योगच होते. स्वामी विवेकानंद मूर्तीपूजेला तेवढे महत्त्व देत नव्हते; परंतु ते त्याचा विरोधही करत नव्हते. त्यांच्यानुसार ‘ईश्वर’ निराकार आहे. ईश्वर सर्व तत्त्वांमध्ये व्यापलेले एकत्व आहे. जग ही ईश्वराचीच सृष्टी आहे. आत्म्याचे कर्तव्य आहे की, शरीर असतांनाच ‘आत्म्याचे अमरत्व’ जाणून घेणे. मनुष्याचे परम भाग्य ‘अमरतेची अनुभूती’ घेण्यातच आहे. राजयोगच मोक्षाचा खरा मार्ग आहे.
परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करून कोलकाताला आल्यावर नागरिकांनी आदरपूर्वक स्वामीजींचे अनेक ठिकाणी स्वागत केले. ‘माझ्या अभियानाची योजना’, ‘भारतीय जीवनात वेद’, ‘आमचे आजचे कर्तव्य’, ‘भारतीय महापुरुष’, ‘भारताचे भविष्य’ अशा विविध विषयांवर त्यांनी व्याख्याने द्यायला प्रारंभ केला. स्वामी विवेकानंद यांनी देश-विदेशात दिलेल्या व्याख्यानातून वेळोवेळी ओजस्वी सुरात स्वतःचे मत व्यक्त केले. स्वामी विवेकानंद यांच्या या विचारांचा लोकांवर पुष्कळ मोठा प्रभाव पडला. त्यामुळे संपूर्ण जगात आर्यधर्म, आर्यजाती आणि आर्यभूमी यांना प्रतिष्ठा मिळाली.
४. स्वामीजींचा अंतिम क्षण
स्वामीजींचा देहत्याग ज्येष्ठ कृष्ण षष्ठी, शके १८२४ म्हणजे ४ जुलै १९०२ या दिवशी झाला. देहत्याग करण्यापूर्वी एक सप्ताह आधीच पंचांग पाहून स्वामीजींनी स्वतःच्या महाप्रस्थानाचा दिवस निश्चित केला होता. त्या वेळी स्वामीजी बंगाल येथील बेलूर मठात होते. जेव्हा मंदिरात सायंकाळच्या आरतीसाठी घंटानाद झाला, तेव्हा ते दुसर्या माळ्यावरील त्यांच्या खोलीत गेले. त्यांनी एका सेवकाला खोलीच्या बाहेर बसून जप करायला सांगितला आणि स्वतः पूर्वाभिमुख होऊन ध्यान लावून बसले. त्यांचे मन महासमाधीद्वारे आत्मस्वरूपात विलीन झाले. त्या वेळी रात्रीचे ९ वाजून १० मिनिटे झाली होती.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
स्वामी विवेकानंद यांचे विचारस्वामी विवेकानंद यांचे काही अनमोल आणि तेजस्वी विचारच आम्हाला स्वतःच्या जीवनात प्रेरणा अन् दिशा मिळावी यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. आपण त्या विचारांचे पुन:पुन्हा स्मरण केले पाहिजे. १. ‘हिंदु’ शब्दाचा उच्चार करताच जर तुमच्यामध्ये अपूर्व अशी चैतन्याची लहर धावत असेल, तरच तुम्ही हिंदु आहात ! २. जो बंधू स्वतःला हिंदु मानतो, तो लगेचच आपल्यासाठी परमप्रिय आणि सर्वांत जवळचा व्हायला पाहिजे. जर असे झाले, तरच तुम्ही स्वतःला ‘हिंदु’ म्हणवून घेऊ शकता. ३. हिंदु धर्मासाठी गुरु गोविंदसिंह यांनी युद्धभूमीवर स्वतःचे रक्त वाहिले, तसे सर्व काही आपल्या हिंदु बांधवांसाठी सहन करण्याची तुमची सिद्धता असेल, तरच तुम्ही ‘हिंदु’ आहात. ४. तुम्हाला आपल्या देशबांधवांमध्ये सहस्रो दोष दिसून येतील; परंतु हे विसरू नका की, ते हिंदु रक्ताचे आहेत. ५. माझा हा देश तमोगुणाच्या खोल गर्तेत आणि भयानक निष्क्रीयतेमध्ये बुडालेला आहे. अशा लोकांच्या हाताने कोणते काम होणार ? त्यांचे रक्त जणू हृदयातच साठले गेले आहे. ते धमन्यांमध्ये प्रवाहित होत नाही, जणू पक्षाघात झाला आहे. या देशाचे शरीर पंगु आणि मृतवत् झाले आहे. ६. जर आपल्यामध्ये बाहुबल असेल, तरच गीता चांगली समजते. भगवान श्रीकृष्णासारख्या महापुरुषाची विराट प्रज्ञा आणि अपूर्व सामर्थ्याचे आकलन होऊ शकते. – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती. |
संपादकीय भूमिकास्वतःतील ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी बुद्धीची नव्हे, तर विवेक आणि समर्पणभाव यांची आवश्यकता आहे ! |