महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या २५ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना दुसर्यांदा क्लिन चीट (निर्दोष)
मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एम्.एस्.सी. बँक) या राज्याच्या शिखर बँकेमध्ये कर्जांचे वितरण करतांना सुमारे २५ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपांच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांविरोधात पुरावे नाहीत, अशी भूमिका पुन्हा एकदा मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने (‘इओडब्ल्यू’ने) घेत त्यांना ‘क्लिन चीट’ दिली आहे. तरीही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, शालिनीताई पाटील, माणिकराव जाधव आणि किसन कावड यांच्या ‘प्रोटेस्ट पिटीशन’मुळे (हरकतीच्या याचिकेमुळे) त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतरच न्यायालय या अहवालाच्या संदर्भात निर्णय देणार आहे.
उद्धव ठाकरे यांचे सरकार असतांना जवळपास अडीच वर्षांपूर्वी अजित पवार यांच्यासह एकूण ७५ जणांना ‘इओडब्ल्यू’ने ‘क्लिन चीट’ दिली होती. सत्तापालट झाल्यानंतर ‘प्रोटेस्ट पिटीशन’मुळे परत अन्वेषण करण्यात आले. दुसर्यांदा केलेल्या अन्वेषणातही आरोपींच्या विरोधात कोणतीही आक्षेपार्ह माहिती आढळलेले नाही’, अशी माहिती ‘इओडब्ल्यू’च्या वतीने देण्यात आली.