मतदारसूचीतील त्रुटींमुळे ‘पुणे बार असोसिएशन’ची निवडणूक पुढे ढकलली !
पुणे – अधिवक्त्यांची शिखर संघटना असलेल्या ‘पुणे बार असोसिएशन’ची निवडणूक मतदारसूचीतील त्रुटींमुळे पुढे ढकलली आहे. अंतिम मतदारसूची प्रसिद्ध करण्यास विलंब लागला, तसेच मतदारसूचीतील १ सहस्र ८३७ नावांवर असोसिएशनच्या पदाधिकार्यांसह सभासद अधिवक्त्यांनी आक्षेप घेतल्याने मतदान पुढे ढकलण्याचा अधिकार्यांनी निर्णय घेतला. या निवडणुकीसाठी ७ सहस्र ८०० वकिलांची नावे असलेली मतदारसूची निश्चित करण्यात आली होती; मात्र मतदारसूचीत बोगस मतदारांची नावे, तसेच पुण्याबाहेरील वकिलांची नावे असल्याचा आक्षेप घेतला. त्यामुळे अधिवक्त्यांच्या निवडणुकीतच कायदेशीर गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अधिवक्त्यांनी केला. आक्षेप असलेल्या नावांची पडताळणी करून अंतिम सूची प्रसिद्ध करण्यासाठी वेळ लागणार असल्याने निवडणूक पुढे ढकलली, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अधिवक्ता दादाभाऊ शेटे यांनी दिली. (अधिवक्त्यांच्या संघटनेच्या निवडणुकीतही गैरप्रकार होणे, हे लज्जास्पद आहे ! – संपादक)