इतरांना साधनेसाठी साहाय्य करणार्या आणि साधनेची तीव्र तळमळ असलेल्या गोवा येथील रामनाथी आश्रमातील सौ. श्रावणी रामानंद परब !
सौ. श्रावणी रामानंद परब या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. पौष कृष्ण सप्तमी (२.२.२०२४) या दिवशी त्यांचा ३७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचे पती ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट येथे दिले आहेत.
सौ. श्रावणी रामानंद परब यांना ३७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. नम्रता
‘आमचे लग्न झाल्यापासून आतापर्यंत सौ. श्रावणी घरी कधी कुणालाही उलट बोलली नाही.
२. शिकण्याची वृत्ती
सौ. श्रावणीला सेवेच्या संदर्भातील सूत्रे लिहायची (टीप) सेवा आहे. यासाठी तिला तिचे हस्ताक्षर सुधारायचे होते. तिने मला चांगले अक्षर काढायला शिकवायला सांगितले. मी तिला शिकवले आणि सराव करायला सांगितला. त्याप्रमाणे तिने चिकाटीने अक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न केले.
(टीप : धान्याच्या सेवेचा अभ्यास करून त्याचा आणि साधकांच्या सेवेचा आढावा लिहून देणे)
३. जवळीक करणे
श्रावणीची आश्रमातील लहान मुलांपासून वयस्कर साधकांपर्यंत सर्वांशी जवळीक आहे.
४. कार्यपद्धतीचे पालन करणे
श्रावणी साधकांना सांगते, ‘‘देवाचे आपल्याकडे सतत लक्ष असते. त्यामुळे आपण प्रत्येक कार्यपद्धत पाळायला हवी.’’ ती स्वतः कार्यपद्धत पाळते आणि इतरांकडूनही कार्यपद्धतीचे पालन करून घेते. तिची आईही रामनाथी आश्रमातच रहाते. त्यांचे वय अधिक आहे, तरी श्रावणी त्यांच्याकडूनही कार्यपद्धतीचे पालन करून घेते.
५. कुटुंबियांची प्रेमाने सेवा करणे
अ. ती जशी आश्रमातल्या सेवा करते, तशी घरी गेल्यावरही स्वतःच्या शारीरिक त्रासाचा विचार न करता घरातील सर्व सेवा करते. तिला इतरांकडून साहाय्याची अपेक्षा नसते.
आ. काहीवेळा आमचे दोघांचेही आध्यात्मिक त्रास पुष्कळ वाढतात. श्रावणीला तीव्र त्रास होत असूनही अनेक वर्षे तिने स्वत:चा विचार न करता माझी काळजी घेतली आहे. मला जेवण जात नसेल, तेव्हा ती मला वेगळा पदार्थ करून द्यायची. मी जेवेपर्यंत ती जेवायची नाही.
इ. वर्ष २०१० ते वर्ष २०१७ या कालावधीत मी तीव्र पोटदुखीने अंथरुणाला खिळून होतो. तेव्हा तिने न कंटाळता मला जेवण भरवणे, अंघोळ घालणे इत्यादी माझी सर्व सेवा केली. प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून ती माझी सेवा करायची.
ई. वर्ष २०१९ मध्ये नवरात्रीनंतर साधकांनी माझ्या आईला (कै. श्रीमती नंदा परब (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७१ वर्षे) यांना) कुडाळ सेवाकेंद्रात न्यायला आणि आईच्या सेवेसाठी सौ. श्रावणीला तिथे रहायला सांगितले. श्रावणीला तीव्र आध्यात्मिक त्रास होत असूनही तिने ८ मास आईची सेवा आनंदाने केली. तिथे १ वर्ष राहिल्यावर आई घरी परत गेली.
६. परिस्थिती स्वीकारणे
मला शारीरिक त्रासांमुळे अनेक वेळा रुग्णालयात भरती करावे लागायचे. प्रत्येक वेळी ती माझ्या समवेत येत असे आणि रुग्णालयातील प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत असे. याविषयी तिने कधीही गार्हाणे केले नाही.
७. इतरांना साहाय्य करणे
अ. श्रावणी लहानपणापासून साधनेत होती. मी साधनेत नवीन असतांना माझ्याकडून बोलतांना काही चुकले किंवा विचार चुकला, तर ती लगेच मला त्याची जाणीव करून देऊन ‘योग्य कसे असायला हवे ?’, ते प्रेमाने सांगत असे. समष्टी सेवा करतांना मला काही अडचण आली, तर ‘ते सूत्र कसे हाताळायचे ?’, हे ती मला सहजपणे सांगते. आज तिच्यामुळेच माझी साधना होत आहे. माझ्या प्रगतीत तिचाही हातभार आहे.
आ. ती तिच्या समवेत सेवा करणार्या वयस्कर साधकांना सांभाळून घेऊन त्यांच्या अडचणी सोडवते. त्यामुळे तिच्या समवेत सेवा करणार्या साधकांना तिचा आधार वाटतो.
इ. श्रावणी सहसाधकांच्या चुकाही प्रेमाने सांगून त्यांना साधनेत साहाय्य करते. साधकांना चुका सांगितल्यावर ती ‘चुका सांगतांना माझे काही चुकले का ?’ असे विचारूनही घेते.
८. साधनेची तळमळ
अ. माझी आई रुग्णाईत असतांना आम्हाला अनेक दिवस घरी जा-ये करावी लागत असे. त्यामुळे आमच्या दोघांच्याही बर्याच सेवा प्रलंबित राहिल्या होत्या. आईचे निधन झाल्यानंतर आम्ही घरून रामनाथी आश्रमात परत आल्यावर श्रावणी म्हणाली, ‘‘आता यापुढे आपण दोघांनी अत्यावश्यक असेल, तरच घरी जाऊया. प्रथम नियोजन करून आपल्या साधनेची घडी बसवूया आणि जोमाने साधना करूया.’’ यातून मला तिची साधनेची तळमळ जाणवली.
आ. श्रावणीला कितीही त्रास होत असला, तरी ती वेळेतच सेवेला जाते. ती नामजपादी उपायही गांभीर्याने करते. ती दिवसभरात तिच्याकडून झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना करते आणि प्रतिदिन मला तिच्या व्यष्टी साधनेचा आढावा पाठवते.
इ. श्रावणी सेवा करून थकली असली, तरी ती साधकांचे दूरभाष लगेच उचलते. ‘साधकांना सेवा करतांना अडचण यायला नको’, असा तिचा विचार असतो.
९. श्रावणीमध्ये भोळा भाव आहे.
१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा मिळालेला आशीर्वाद !
‘मी आणि माझी पत्नी सौ. श्रावणी दोघांनाही तीव्र अध्यात्मिक त्रास आहे. विवाहाच्या आदल्या दिवशी आम्हा दोघांनाही तीव्र आध्यात्मिक त्रास होत होता. प.पू. गुरुदेवांनी आम्हाला रात्रभर नामजपादी उपाय करायला सांगितले. दुसर्या दिवशी आमचा विवाह झाल्यावर आमच्या डोक्यावर अक्षता वहातांना प.पू. गुरुदेवांनी विचारले, ‘‘आज तुमचा त्रास न्यून झाला आहे. तुम्ही काय प्रयत्न केले ?’’ तेव्हा ‘आम्ही नामजपादी उपाय केले’, असे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्हा दोघांचाही त्रास न्यून व्हावा आणि विवाहातील अडथळे दूर व्हावेत’, यासाठी मी रात्रभर प्रार्थना करत होतो.’’ तेव्हा आमचा दोघांचाही कृतज्ञताभाव जागृत झाला. त्यानंतर प.पू. गुरुदेवांनी आम्हाला भेटवस्तू दिल्या आणि आशीर्वाद देतांना सांगितले, ‘‘आता माझी काळजी मिटली. आता दोघांनी एकमेकांना सांभाळा. मी देवाकडे प्रार्थना करतो, ‘तुमची दोघांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होवो !’’
११. जाणवलेले पालट
११ अ. सहनशीलता वाढणे : पूर्वी साै. श्रावणीला शारीरिक त्रास सहन व्हायचा नाही. त्रास होऊ लागल्यावर ती लगेच झोपायची. आता तिला कितीही त्रास होत असला, तरी ती त्यावर उपाय करून सेवा करते. एकदा तिचे मनगट पुष्कळ दुखत असतांना तिला काही तातडीच्या सेवा करायच्या होत्या. तिने मनगटाला तेल लावून वेदना सहन करत त्या सेवा पूर्ण केल्या.
११ आ. स्वभावदोषांवर मात करण्याचा प्रयत्न करणे : श्रावणी भावनाशील आहे. त्यामुळे एखादा प्रसंग घडल्यानंतर तिला निराशा येत असे. रात्री मी खोलीत आल्यावर ती मला घडलेला प्रसंग सांगत असे; पण तोपर्यंत तिला त्या प्रसंगाचा पुष्कळ त्रास होत असे. आता ती प्रसंग घडल्यावर लगेच सांगते. त्यासंदर्भात तिला तिचा स्वभावदोष सांगितल्यावर ती लगेच स्वीकारते आणि स्वयंसूचना सत्र करून त्या स्वभावदोषावर मात करायचा प्रयत्न करते.
११ इ. अपेक्षांचे प्रमाण न्यून होणे : पूर्वी आमच्या एकमेकांकडून अपेक्षा असायच्या. त्यामुळे आमची चिडचिड व्हायची. आता ‘आम्ही दोघांनीही एकमेकांची क्षमा मागणे आणि एकमेकांना साहाय्य करणे’, असे प्रयत्न केल्यामुळे अपेक्षांचे प्रमाण न्यून झाले आहे.’
– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.०१.२०२४)
सौ. श्रावणी रामानंद परब यांच्या समवेत सेवा करणार्या सौ. मनीषा गायकवाड यांना त्यांच्यामध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
१. पुढाकार घेऊन सेवा करणे
‘अलीकडे सौ. श्रावणी यांचे पुढाकार घेऊन सेवा करण्याचे प्रयत्न वाढले आहेत.
२. मोकळेपणा वाढणे
व्यष्टी साधनेचा आढावा देतांनाही त्या पूर्वीपेक्षा मोकळेपणाने बोलतात. पूर्वी त्यांना सेवेतल्या काही अडचणी सांगितल्या, तर त्या फारसा प्रतिसाद देत नसत. आता त्या अशा अडचणींवर सहजतेने उपाय सांगतात. त्यामुळे आता कुठलीही सूत्रे त्यांच्याशी सहजतेने बोलता येतात. आता मला सेवेत त्यांचा पुष्कळ आधार वाटतो.
३. स्वीकारण्याची वृत्ती वाढणे
आता आयत्या वेळी एखादी सेवा आली, तर त्या नियोजन बाजूला ठेवून ती सेवा पूर्ण करतात.
४. प्रतिक्रियात्मक बोलणे न्यून होणे
पूर्वी त्यांना त्यांच्या ‘दिवसभराच्या सेवा, नामजपादी उपाय, विश्रांती इत्यादी सर्व ठरलेल्या नियोजनाप्रमाणे झालेच पाहिजे’, असे वाटायचे. त्यामध्ये काही पालट झाला, तर त्यांना ते स्वीकारता यायचे नाही. त्यांचे नामजपादी उपाय न्यून झाले, तर त्या प्रतिक्रियात्मक बोलायच्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे असे बोलणे न्यून झाले आहे.
५. आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे गांभीर्य
सेवा करतांना त्या मध्येमध्ये नामजपादी उपाय करतात आणि सहसाधकांनाही नामजपादी उपाय अन् स्वयंसूचना सत्र करण्याची आठवण करून देतात. सेवा करतांना त्या अधिकाधिक चैतन्य ग्रहण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कधी सेवा करून थकवा आला, तरी त्या राहिलेले नामजपादी उपाय गांभीर्याने पूर्ण करतात.
६. अलीकडे त्यांचा चेहरा प्रसन्न दिसतो.’
– सौ. मनीषा दामोदर गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१.२०२४)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |