नम्र, धार्मिक वृत्तीचे आणि गंभीर आजारपणातही सकारात्मक अन् आनंदी असणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) प्रफुल्ल मोरोबा शेणवी बोरकर (वय ७८ वर्षे) !
२.२.२०२४ या दिवशी कै. प्रफुल्ल मोरोबा शेणवी बोरकर यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे, त्या निमित्ताने…
‘२२.१.२०२४ या दिवशी माझे वडील प्रफुल्ल मोरोबा शेणवी बोरकर (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. ते मागील साडे तीन वर्षांपासून रुग्णाईत होते. २.२.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या शेवटच्या आजारपणात आणि मृत्यूसमयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘कौशल्य, बुद्धीमत्ता आणि प्रामाणिकपणा’, या गुणांच्या आधारे नोकरीतील दायित्वे उत्कृष्टपणे सांभाळणे
माझे वडील प्रफुल्ल मोरोबा शेणवी बोरकर यांचा जन्म पाणीवाडा (बोरी, गोवा) येथे झाला. त्यांचे वडील (माझे आजोबा) (कै.) मोरोबा नारायण शेणवी बोरकर हे श्री शांतादुर्गा देवस्थान (कवळे, गोवा) येथे कमाविसदार (सचिव) होते. माझ्या वडिलांनी नोकरी करत असतांना कायद्याच्या पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कौशल्य, बुद्धीमत्ता आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या आधारे वडिलांनी मामलेदार, उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, कोकण रेल्वे कॉर्पाेरेशनचे विशेष भूसंपादन अधिकारी, पंचायत संचालक आणि गोवा राज्य निवडणूक आयुक्त, ही दायित्वे उत्कृष्टपणे सांभाळली.
२. नम्रता
वडील उच्च पदावर कार्यरत होते, तरीही त्यांचे जीवन अतिशय साधे होते. त्यांना आपल्या पदाचा अभिमान नव्हता. ते सर्वांशी नम्रपणे आणि प्रेमाने वागायचे.
३. कुटुंबीय आणि समाजातील लोक यांना साहाय्य करणे
ते कुटुंब आणि नातेवाईक यांना साहाय्य करायला नेहमी तत्पर असायचे. ते आमच्या सर्व कुटुंबासाठी आधारस्तंभ होते. काही वेळा त्यांच्याकडे कामासाठी समाजातील काही लोक यायचे. त्या वेळी त्यांना साहाय्य करण्यासाठी ते स्वतः त्यांचे निवेदन (अर्ज) लिहून द्यायचे.
४. धार्मिक वृत्ती
ते प्रतिदिन सकाळी श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र म्हणायचे. त्यानंतर ते नामजप करायचे. त्यांना भजन आणि कीर्तन यांची आवड होती. शक्य असेल, तेव्हा ते भजन आणि कीर्तन ऐकण्यासाठी जायचे.
५. दैनिक ‘सनातन प्रभात’चे अभ्यासपूर्ण वाचन करणे
आरंभीपासूनच ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक होते. ते प्रतिदिन वेळ काढून दैनिक अभ्यासपूर्ण वाचायचे. ते म्हणायचे, ‘‘सनातन प्रभात’मध्ये जे ज्ञान आहे, ते कोणत्याच दैनिकात मिळू शकत नाही.’’
६. सनातनच्या साधकांचा आदर करणे आणि त्यांना साहाय्य करणे
ते सात्त्विक उत्पादनांचा नियमित वापर करायचे. ते ‘सनातन प्रभात’चे विशेषांक, सनातनचे ग्रंथ आणि ‘सनातन पंचांग’ यांसाठी अर्पण म्हणून विज्ञापन द्यायचे. ते सनातनच्या साधकांचा आदर करायचे, तसेच शासकीय आणि न्यायालयीन कामांसाठी साधकांना साहाय्य करायचे.
७. रुग्णाईत असतांनाही सकारात्मक आणि आनंदी रहाणे
सप्टेंबर २०२० मध्ये त्यांच्या हृदयाचे शस्त्रकर्म झाले. त्यानंतर मागील ३ वर्षांपासून त्यांच्यावर ‘डायलिसिस’ची (टीप १) प्रक्रिया करावी लागत होती; मात्र त्याविषयी त्यांनी कधीही गार्हाणे केले नाही. ते सर्व त्रास सहन करायचे. त्यांच्या मुखावर सतत हास्य असायचे. मागील ३ वर्षांच्या कालावधीत त्यांची ७ शस्त्रकर्मे झाली. ते प्रत्येक शस्त्रकर्माच्या वेळी सकारात्मक होते. ते मला ‘घाबरू नकोस, सर्व चांगले होणार’, असे सांगून धीर द्यायचे. ते सतत आनंदी रहायचे.
टीप १ – डायलिसिस : मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया.
८. गंभीर रुग्णाईत असतांनाही नामजप करणे
९.१.२०२४ या दिवशी त्यांना ‘ब्रेन स्ट्रोक’ (टीप २) आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती केले. तेव्हा मी भ्रमणभाषवर ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप लावून ठेवला होता. मी वडिलांना नामजपाविषयी विचारल्यावर ते मला म्हणायचे, ‘‘नामजप चालू आहे.’’ काही दिवसांनी त्यांचे बोलणे बंद झाले. २१.१.२०२४ या दिवशी ते बेशुद्ध स्थितीत होते. नामजप लावलेला भ्रमणभाष मी त्यांच्या कानाजवळ धरला. तेव्हा त्यांनी लगेच डोळे उघडले आणि पापण्यांची उघड-झाप केली. त्या वेळी ‘ते ‘माझा नामजप चालू आहे’, असे सांगत आहेत’, असे मला जाणवले.
टीप २ – ब्रेन स्ट्रोक : कधी कधी मानसिक ताण, उच्च रक्तदाब इत्यादी कारणांमुळे मेंदूला धक्का बसतो. मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होतो. यालाच ‘ब्रेन स्ट्रोक’, असे म्हणतात.
९. श्रीरामाचा नामजप ऐकत आणि अयोध्येतील श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर प्राण सोडणे
२२.१.२०२४ या दिवशी सकाळी ११ वाजता वडिलांवर उपचार करणारे आधुनिक वैद्य आले. त्यांनी ‘वडिलांची प्रकृती नाजूक आहे’, असे मला सांगितले. त्या वेळी देवाने सुचवल्याप्रमाणे मी भ्रमणभाषवर श्रीरामरक्षास्तोत्र लावले. त्यानंतर ४० मिनिटे ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप भ्रमणभाषवर मोठ्या आवाजात लावला. मी दुपारी १२ वाजता दूरचित्रवाणीवर अयोध्या येथील श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम लावला आणि त्याविषयी वडिलांना सांगितले. तो आवाज वडिलांच्या कानावर पडत होता आणि ते अधूनमधून डोळ्यांची उघड-झाप करत होते. दुपारी १२ ते १.३० या कालावधीत ते स्थिर होते. श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांनी प्राण सोडला. मृत्यूसमयी त्यांच्या चेहर्यावर शांती आणि समाधान होते.
माझे वडील माझ्यासाठी मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते. ‘त्यांच्या भोवती सतत भगवंताच्या नामाचे संरक्षककवच राहू दे आणि त्यांना सद्गती अन् मुक्ती मिळू दे’, अशी मी भगवंत आणि श्री गुरुदेव यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. संगम प्रफुल्ल बोरकर (कै.) प्रफुल्ल मोरोबा शेणवी बोरकर यांचा मुलगा), फोंडा, गोवा. (२८.१.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |