पिंपरी (पुणे) येथे ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पा’च्या पडताळणीसाठी खासगी सल्लागार नको !
‘सोसायटी फेडरेशन’चा तीव्र विरोध !
पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ (एस्.टी.पी.) कार्यान्वित आहेत कि नाहीत, याची पडताळणी करण्यासाठी खासगी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया चालू करण्यात आली आहे; परंतु या निवडीला चिखली-मोशी-चर्होली आणि ‘पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन’ने विरोध केला आहे.
शहरातील गृहनिर्माण संस्थांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालू ठेवण्याविषयी प्रशासनाने बंधनकारक केले आहे; परंतु काही सोसायट्यांमध्ये हे प्रकल्प बंद असल्याचे निदर्शनास आले. शहरातील ३३१ मोठ्या गृहनिर्माण संस्थांच्या प्रकल्पांची पडताळणी एका खासगी संस्थेकडून करण्यात आली. त्यामध्ये २८४ प्रकल्प कार्यान्वित असल्याचे आढळून आले, तर ४७ प्रकल्प बंद असल्याचे दिसले. बंद असलेल्या सोसायट्यांना नोटीस दिल्यानंतर ६ प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यात आले; मात्र ४१ प्रकल्प अद्यापही बंद स्थितीत आहेत. त्या सोसायट्यांना ‘पर्यावरण विभागा’ने प्रकल्प चालू करा; अन्यथा नळजोडणी तोडण्यात येईल’, अशी चेतावणी दिली आहे.
‘सोसायटी फेडरेशन’चे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले की, प्रकल्प चालू कि बंद, त्याची नोंद, तसेच अहवाल यांची पडताळणी सध्या पर्यावरण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित विभागाचे कर्मचारी करत आहेत. मग पुन्हा त्याच कामाकरता खासगी सल्लागाराची आवश्यकता काय ? कि हा नागरिकांच्या पैशांचा अपव्यय आहे ? त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रहित करावी.