इतिहासाचा सखोल अभ्यास न करता स्वतःचे अज्ञान प्रकट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार !
छत्रपती शिवराय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण
स्थळ श्रीरामजन्मभूमी अयोध्यानगरी – या पवित्र नगरीत श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तो दिवस सर्व रामभक्तांसाठी अमृताचा दिवस होता आणि सर्व हिंदूंसाठी पर्वकाळ होता. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ ३ दिवस उपवास करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी ३ दिवस उपवास करण्याऐवजी अत्यंत श्रद्धेने ११ दिवस उपवास केला. या थंडीच्या दिवसातही ते ११ दिवस भूमीवर झोपले. पंतप्रधान पदावर विराजमान असतांनाही त्यांनी असे व्रत सलग ११ दिवस तेही श्रद्धेने आणि भक्तीभावाने आचरले. आपल्या संस्कृतीने तपाचरण करण्यावर भर दिला आहे. संस्कृतीचा हा आदेश पंतप्रधानांनी तंतोतंत पाळला. एवढेच नाही, तर देशातील विविध तीर्थक्षेत्रांची त्यांनी ११ दिवस यात्रा केली, साधना केली. त्यांचा हा मनोनिग्रह आणि व्रतस्थवृत्ती यांचे यथार्थ कौतुक ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी प्रकटपणे प्रभु श्रीरामाला साक्षी ठेवून केले. मोदी यांचे कौतुक करतांना स्वामीजींना छत्रपती शिवरायांचे स्मरण झाले. श्रीशैलम् (आंध्रप्रदेश) येथे छत्रपती शिवरायांनी ३ दिवस केलेल्या व्रताचे वर्णन केले.
श्रीरामावर, छत्रपती शिवरायांवर, हिंदु संस्कृतीवर आणि व्रतस्थ जीवनावर श्रद्धा असलेल्या एकाही व्यक्तीला स्वामीजींचे बोल कडवट वाटले नाहीत. स्वामीजींच्या मुखातून निघालेले प्रत्येक अक्षर प्रत्येकाच्या मनात आदरभाव अन् श्रद्धाभाव जागृत करण्याइतके समर्थ होते.
१. आमदार रोहित पवार यांचे वक्तव्य अभ्यासहीन
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचे पूर्वज आहेत. राष्ट्रीयदृष्ट्या ऐतिहासिक परंपरेचा विचार करता आपण सारे जण छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहोत. ते आपले राजे आणि आपण त्यांची प्रजा आहोत. प्रजेचे हित पहाणार्या राजाला प्रत्येक व्यक्ती आपल्या लेकरासारखी आहे. त्या भावनेने आपण छत्रपती शिवरायांकडे पाहिले पाहिजे. ‘छत्रपती शिवराय नरेंद्र मोदी यांच्यासारख्या राष्ट्रनिष्ठ पंतप्रधानांकडे वात्सल्य दृष्टीनेच पहात असतील’, अशी एखाद्याची भावना असेल, तर त्या भावनेचा आपण आदर केला पाहिजे. अशा प्रकारची भावना मनात उत्पन्न होत असेल, तर त्यास दोष देण्याचे काही कारण नाही.
असे असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना स्वामीजींचे हे शब्द रुचले नाहीत. त्यांनी तात्काळ स्वामीजींना खोटे ठरवून स्वतःचे अज्ञान व्यक्त केले. इतिहासाचा सखोल अभ्यास नसतांनाही वक्तव्य करण्याची प्रथा आज आपल्या समाजात रूढ झाली आहे. याची प्रचीती वारंवार येत आहे. छत्रपती शिवरायांविषयी समर्थ रामदासस्वामींनी ‘श्रीमंत योगी’ असे विशेषण वापरले आहे. त्याचा दाखला प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी दिला आहे. वास्तविक या विद्वत सभेत स्वामीजींनी जे विचार मांडले, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे नव्हते. ही समज आजच्या नेतेमंडळींना राहिलेली नाही, याचे दुःख आहे.
२. रोहित पवार यांची संकुचित वृत्ती
मोठ्यांच्या आणि श्रेष्ठांच्या पाऊल खुणांचा मागोवा घेत प्रत्येकाने जीवन यात्रा अभिमानाने करावी, अशी आपली परंपरा सांगते. या परंपरेचे संस्कार ज्याच्यावर झाले आहेत, त्याला स्वामीजींचे विधान खटकण्याचे काहीही कारण नाही. एखाद्या व्यक्तीचे नाक चोंदले आहे. अशी व्यक्ती अत्तराच्या दुकानात गेली, तर तिला तेथील परिमलाचा आनंद उपभोगता येणार नाही, तसेच विद्वत सभेत पूर्वग्रहदूषित मनाने आणि संकुचित वृत्तीने जी व्यक्ती उपस्थित रहाते किंवा तेथील सभेतील भाषणाचा अंश अशा व्यक्तीच्या वाचनात येतो, त्या व्यक्तीला वक्त्याच्या भावनेशी एकरूप होऊन तसा आनंद लुटता येत नाही. तशी अवस्था रोहित पवारांची झाली आहे, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.
३. छत्रपती शिवरायांच्या मनात संन्यास घेण्याची इच्छा निर्माण होण्यात चुकीचे काय ?
‘छत्रपती शिवरायांना संन्यास घेण्याची इच्छा निर्माण झाली’, असे म्हणण्यात शिवरायांचा अपमान कसा होतो ? हे अनाकलनीय आहे. संन्यास घेण्याची इच्छा निर्माण होणे, याचा अर्थ ‘सर्व वासनांवर विजय मिळवणे आणि व्रतस्थ जीवन जगून स्वतःचे संपूर्ण जीवन ईश्वरचरणी समर्पित करणे’, असा आहे. थोडक्यात ‘व्यावहारिक जीवनाचा त्याग करून परमार्थिक जीवनाचा आरंभ करावा’, अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होणे, म्हणजे संन्यास घेण्याची इच्छा होणे होय. अशी इच्छा छत्रपती शिवरायांच्या मनात निर्माण झाली, तर यात त्यांचा अपमान होण्याचे काहीही कारण नाही. मुळातच हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याविषयी अभ्यास अन् श्रद्धा नाही. त्यामुळे हिंदु संस्कृतीला अभिमानास्पद, आदरयुक्त, वंदनीय असलेल्या गोष्टींचा तिरस्कार वाटतो. हे गुणग्राहकतेचे लक्षण नाही, असे म्हणता येते.
४. छत्रपती शिवरायांच्या मनात संन्यास घेण्याचे विचार येण्या बद्दलचा दाखला
४ अ. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेला दाखला : छत्रपती शिवराय (१० मार्च १६७७ या दिवसाच्या आसपास) कर्नूळच्या ईशान्येला असलेल्या तुंगभद्रा आणि कृष्णा यांच्या संगमावर जाण्यास निघाले. तुंगभद्रा आणि कृष्णा या दोन नद्यांचा जिथे संगम होतो, त्या संगमाला ‘निवृत्तीसंगम’ असे संबोधले जाते. हिंदु संस्कृतीत दोन नद्यांचे संगम हे तीर्थक्षेत्र मानले जाते. छत्रपती शिवराय या तीर्थक्षेत्री आले आणि तिथे त्यांनी काही धार्मिक विधी केले. त्यानंतर आपल्या समवेत कोणतेही सैन्य न घेता केवळ मोजक्याच मंडळींना घेऊन ते श्रीशैलम् मल्लिकार्जुन या (बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक) ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी गेले. हे क्षेत्र सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र अन् पावन आहे. आपल्या संस्कृतीचा नितांत अभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांना ही भूमी आकर्षित करते. या भूमीवर प्रत्यक्ष भगवान शिवाचा वास असल्याने शिवभक्त असलेल्या छत्रपती शिवरायांना या भूमीची ओढ असणे स्वाभाविक आहे. (गोव्याच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवरायांनीच केला, हे सर्वज्ञात आहे.) ते एकांतात असलेले हे पवित्र तीर्थक्षेत्र सोडून अन्यत्र जावे, असे त्यांना वाटले नाही. याच स्थळी बसून आपण ध्यानधारणा करावी. संसारातून आणि सर्व व्यापातून मुक्त व्हावे, असे त्यांना वाटले. निसर्गाच्या सहवासात राहून ईश्वराची उपासना करावी, असे छत्रपती शिवरायांना वाटले.
श्रीशैल पर्वताच्या शिखरावरून खाली पाहिल्यावर कृष्णामाईचा प्रवाह सागराकडे वहात जातांना दिसतो. त्या स्थळाला ‘पाताळगंगा’ असे म्हणतात. हे मंदिर विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांनी बांधले आहे. विजयनगरच्या एका राणीने शिखरावरून कृष्णामाई प्रवाहापर्यंतच्या पायर्या बांधल्या. या एका भागाला ‘नीलगंगा’ म्हटले जाते. या नीलगंगेत छत्रपती शिवरायांनी स्नान केले. मंदिरात जाऊन श्रीशैल महादेवांचे दर्शन घेतले. त्यांच्यातील भक्तीभाव जागा झाला आणि ते शिवचरणी तल्लीन झाले. त्यांच्या अंतःकरणात प्रसन्नता आणि विरक्ती दाटून आली. शिवपूजा करत असतांना त्यांच्या मनात विविध भावना निर्माण झाल्या. आपण या भौतिक जीवनाचा त्याग करून संन्यास घ्यावा, असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. श्रीविष्णूने शिवपूजन करत असतांना एक कमळ कमी पडले; म्हणून स्वतःचे नेत्रकमळ अर्पण केले. त्याप्रमाणे ‘स्वतःचे शिरकमल शिवचरणी अर्पण करावे’, असा विचारही त्यांच्या मनात चमकून गेला. (येथे याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. भाषेचे आणि सर्वसामान्यपणे भावना व्यक्त करतांना शब्दांचे ज्ञान ज्यांना नाही, त्यांच्यासाठी हे सांगणे नितांत आवश्यक आहे. ‘शिरकमळ ईश्वराच्या चरणी अर्पण करणे याचा अर्थ उरलेले सर्व आयुष्य ईश्वराला समर्पित करणे’, असा आहे.)
छत्रपती शिवरायांना त्यांच्या समवेत असलेल्या अन्य मंडळींनी समजावले आणि त्यांनी स्वतःलाही सावरले. ‘आपण हाती घेतलेले राष्ट्रकार्य अखेरच्या श्वासापर्यंत त्यागायचे नाही’, हा विचारही त्यांनी दृढ केला.
(संदर्भ : ‘राजा शिवछत्रपती’, लेखक : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पृष्ठ क्र. ७६५ आणि ७६६)
छत्रपती शिवराय श्रीशैलक्षेत्री गेले, त्या वेळी त्यांचा राज्याभिषेक झालेला होता. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ पूर्णत्वाला गेली होती. हातून घडलेल्या कार्याने ते कृतार्थ झाले होते.
४ आ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरक्तीविषयी सभासदाच्या बखरीत आलेला उल्लेख : याविषयीचा उल्लेख सभासदाच्या बखरीत आढळतो तो पुढीलप्रमाणे, ‘केवळ कैलासच असे हे दुसरे स्थळ पाहून महाराजांना परम आनंद झाला. ते देहभाव विसरून शिवचरणी तल्लीन झाले. परमावधीची विरक्ती त्यांच्या अंगात संचारली. ‘श्री मल्लिकार्जुनाची पूजा बांधण्यासाठी बिल्वदलाच्या ऐवजी स्वतःचे शिरकमल वहावे’, असे त्यांना तीव्रतेने वाटू लागले. तेवढ्यात श्री भवानीदेवी महाराजांच्या अंगी अविर्भवली आणि म्हणाली, ‘तुज ये गोष्टी मोक्ष नाही. हे कर्म करू नको. पुढे कर्तव्यही उदंड तुज होते करणे आहे.’
(संदर्भ : ‘शककर्ते शिवराय’, लेखक : शिवकथाकार विजयराव देशमुख, पृष्ठ ३२२)
आता यापेक्षा अधिक सांगणे न लगे !
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२६.१.२०२४)