तीर्थक्षेत्र जेजुरी गड विकासासाठी राज्य नियोजन विभागाकडून ८ कोटींच्या निधीचे वितरण !
पुणे – जेजुरी गडविकास आराखड्याचा ३४९ कोटी रुपयांचा आराखडा संमत करण्यात आला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील १०९ कोटी रुपयांच्या कामांचे भूमीपूजन झाले आहे. ५३ मोठी बांधकामे केली जाणार आहेत. त्यासाठी एकूण ८ कोटी रुपयांचा निधी नियोजन विभागाने वितरित केला आहे. त्यामुळे विकास आराखड्यातील कामांना गती मिळणार आहे. पुढील २ वर्षांच्या कालावधीत मंदिर आणि परिसरात करण्यात आलेल्या अनियोजित जोडण्या आणि बांधकामे काढून गडाला पूर्ववैभव देण्याचे नियोजन आहे.
मुख्य खंडोबा मंदिर, तटबंदीचे जतन आणि दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये, दीपमाळेचे जतन अन् दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये, पायर्या, कमानींचे जतन तसेच दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये, तर होळकर तलाव, पेशवे तलाव, जलकुंड आणि पायर्या असलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये, असा एकूण ८ कोटी रुपयांचा निधी नियोजन विभागाने वितरित केला आहे. जेजुरी गडविकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यात वास्तूचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा अन् पर्यटक सोयीसुविधा आणि जलव्यवस्थापन करण्यात येणार आहे.