‘श्री निर्विचाराय नमः।’ हा नामजप करतांना गोवा, येथील श्री. नीलेश पाध्ये यांना आलेल्या अनुभूती

श्री. नीलेश पाध्ये

१. ‘श्री निर्विचाराय नमः।’ हा नामजप करतांना सर्व कुंडलिनी चक्रांवर आणि शरिराच्या सर्व सांध्यांमध्ये शिवपिंडीचे अस्तित्व जाणवणे

‘१२.६.२०२१ या दिवशी मी घरातील देवांची पूजा करून देवासमोर ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करत बसलो. थोड्या वेळाने मला सर्वप्रथम माझ्या कुंडलिनी चक्रांच्या जागेवर शिवपिंडीचे अस्तित्व जाणवले. त्यानंतर हळूहळू सर्व सांध्यांच्या ठिकाणी शिवपिंडीचे अस्तित्व जाणवू लागले. त्यानंतर हळूहळू मला दोन सांध्यांच्या मधील पोकळीत शिवपिंडीचे अस्तित्व जाणवू लागले. प्रथम सांध्यांच्या ठिकाणी आणि नंतर त्यांच्या पोकळीत शिवपिंडीचे अस्तित्व सूक्ष्म होत गेले.

२. सर्व पेशींमध्ये आणि सर्वत्र शिवपिंडीचे अस्तित्व जाणवून मन शांत होणे अन् शेवटी अनाहतचक्राच्या ठिकाणी शिवपिंडी स्थापित होणे

थोड्या वेळाने माझ्या सर्व पेशींमध्ये मला शिवपिंडीचे अस्तित्व जाणवू लागले. त्यानंतर ‘विश्‍वातील सर्व गोष्टी, उदा. गंगामैय्या, नर्मदामैय्या, सर्व देवस्थाने, प.पू. डॉक्टर, सर्व साधक, एवढेच काय आमची लांजा आणि रत्नागिरी येथील शेतजमिनी, अशा सर्व गोष्टी माझ्यातच आहेत’, याची मला जाणीव होऊ लागली. असे असूनही माझे मन फार शांत होते. त्यानंतर एकच तेजोमय शिवपिंडी माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी स्थापित झाली.

३. शेतभूमीविषयी असणारी चिंता नष्ट होणे

थोड्या वेळाने नामजप झाल्यावर मला विलक्षण शांतता जाणवली. काही दिवसांपासून मला शेतभूमींविषयी चिंता सतावत होती. त्या भूमी आणि प.पू. डॉक्टर हे दोन्ही माझ्यातच असल्याने त्या चिंताच नष्ट झाल्या. ही विलक्षण अनुभूती दिल्याबद्दल प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. नीलेश पाध्ये, फोंडा, गोवा.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक